आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Will Take Oath For The Second Time As Delhi Cm News In Marathi

इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवणार नाही -केजरी, बघा शपथविधी सोहळ्याचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: शपथविधीनंतर कार्यकर्त्यांना आणि दिल्लीच्या जनतेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल.)

नवी दिल्ली- दिल्लीत पूर्णबहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाने काही नेते इतर राज्यांमध्ये निवडणुका लढविण्याची भाषा करीत आहेत. मित्रांनो हा अहंकार आहे, असे सांगून आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सध्याच इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. याचाच दुसरा अर्थ असा, की आप केवळ दिल्लीच्या विकासावर भर देणार आहे.
कार्यकर्त्यांच्या आणि दिल्लीच्या विशाल जनसागराला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, की दिल्लीच्या जनतेने मतांचा वर्षाव केला आहे. बहुमत आमच्या झोळीत टाकले आहे. यामुळे अहंकार जागृत होऊ शकतो. पण भाजप आणि कॉंग्रेसचा पराभव अहंकारामुळे झाला असल्याचे आम्हाला लक्षात ठेवावे लागेल. आमच्या अहंकार आला तर आमचीही तशीच स्थिती होईल. त्यामुळे आम्हाला चौकस राहावे लागणार आहे.
दिल्लीच्या विकासावर भर राहणार असल्याचे सांगून केजरीवाल म्हणाले, की दिल्लीत आम्हाला बहुमत मिळाले आहे. केंद्रात भाजपकडे बहुमत आहे. अशा वेळी दोघांनी मिळून काम केले तर दिल्लीचा सर्वांगिण विकास साधता येईल. आम्ही भाजपच्या किरण बेदी आणि कॉंग्रेसच्या अजय माकन यांची सरकार चालवण्यात मदत घेणार आहोत. दिल्लीतून भ्रष्टाचार दूर करायचा आहे. गुंडागर्दी मिटवायची आहे. एखादा व्यक्ती आपची टोपी घालून गुंडागर्दी करणार असेल तर त्याला लगेच पकडा. तो निश्चितच आपचा कार्यकर्ता नाही. पोलिसांनी त्याला दुहेरी शिक्षा करावी.
दिल्लीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हणून केजरीवाल म्हणाले, की गेल्या काही दिवसांमध्ये दोन धर्मांत, समुदायांत भांडण लावण्याचा प्रयत्न होत आहे. दंगे भडकवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. चर्चला आग लावली जात आहे. पण दिल्लीचे लोक हे सहन करणार नाही. दिल्लीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण आहे. त्यात आम्ही बाधा येऊ देणार नाही.
अरविंद केजरीवाल यांनी मी अरविंद केजरीवाल ईश्वराची शपथ घेतो की... असे म्हणत लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर मनिष शिसोदिया, असीम अहमद, संदीप कुमार, सतेंद्र जैन, गोपाल राय आणि जितेंद्रसिंह तोमर यांनी अनुक्रमे शपथ घेतली. यापूर्वी केजरीवाल यांनी निवासस्थानी सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या मातोश्री गीता देवी यांनी त्यांना ओवाळले. शपथविधीच्या शुभेच्छा दिल्या.
अरविंद केजरीवाल आज (शनिवारी) दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. केजरीवाल यांनी बरोबर एका वर्षापूर्वी याच दिवशी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दिल्ली विधानसभेत 'आप'ने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे.

केजरीवाल यांच्या गावाहून 150 लोक आले होते. यात गावातील पुरोहितांचाही समावेश होता. केजरीवाल यांचे अभिनंदन करण्‍यासाठी बॉलिवूडमधील अभिनेते जावेद जाफरी हेही आले होते. लखनौ लोकसभा मतदार संघातून जावेद जाफरी यांनी आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.
काही दिवसांपासून केजरीवाल तापाने आजारी आहेत. आजही केजरीवाल यांना 100 डिग्री सेल्सियस ताप आहे.
14 फेब्रुवारी 2014 रोजी दिला होता राजीनामा...
अरविंद केजरीवाल यांनी बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2014 रोजी जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावरून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी रेडिओवर जाहिरात देऊन समस्त दिल्लीकरांना 'आप'च्या शपथविधी सोहळ्यांचे निमंत्रण दिले होते. आयोजकांनी 35 हजार लोकांना बसण्यासाठी व्यवस्था केली होती. 50 हजार लोक उभे राहून कार्यक्रम पाहू शकतील, अशी व्यवस्था होती. रामलीला मैदानावर व्हीआयपी पाहुण्यांना बसण्यासाठी एन्क्लोजर तयार करण्यात आले होते. 'आप' ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजप नेते तसेच कॉंग्रेस नेत्यांना निमंत्रित केले होते. मात्र, पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मोदी आज महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. मोदींचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे.

रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आयोजनस्थळी तीन हजार सुरक्षारक्षक तैनात केले होते. व्यासपीठाला स्वतंत्र सुरक्षा वेढा ठेवण्यात आला होता. रामलीला मैदानावर 50 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. प्रेक्षकांसाठी 12 एलसीडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. केजरीवाल आणि उप-राज्यपाल नजीब जंग यांना व्यासपीठावर येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्‍यात आले होते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, सहकाऱ्यांसोबत घरी चर्चा करताना अरविंद केजरीवाल... त्यांच्या गावाकडून आलेली मंडळी... आदी...