आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan News In Marathi, Lok Sabha Election, Amita Deshmukh

निवडणुकीचा आखाडा: ‘आदर्श’ग्रस्त अशोक चव्हाणांना वेध दिल्लीचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ‘आदर्श’चे भूत मानगुटीवर असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजकीय पुनर्वसनाची घाई झालेली दिसते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राज्यात डाळ शिजू देत नसल्याचे लक्षात आल्याने अशोकरावांनी आता दिल्लीचा मार्गच योग्य असल्याचे ठरवून नांदेडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत; परंतु ‘आदर्श’मुळे तिकीट मिळण्यात अडचणी आल्यास किमान त्यांच्या सौभाग्यवती अमिता देशमुख यांना उमेदवारी देण्याचा पर्यायही त्यांनी श्रेष्ठींसमोर ठेवला आहे.


शंकरराव चव्हाण यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी 1989 मध्ये नांदेड लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते राज्यातील राजकारणात स्थिरावले. दरम्यान, अशोक चव्हाण यांचे पुढे जाणे धोक्याचे राहील हे जाणून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चव्हाणांचेच मेहुणे भास्करराव खतगावकर यांना खतपाणी घातले. ते तिसर्‍यांदा नांदेडचे खासदार आहेत.


एरवी खतगावकर यांच्या पाठीशी अशोक चव्हाण असायचे; परंतु आदर्श प्रकरणाने गेली साडेतीन वर्षे विजनवासात गेलेल्या चव्हाण यांची आता सक्रिय राजकारणात परत येण्याची धडपड सुरू आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्या पुनर्वसनाबाबत तयारी केली होती; परंतु अशोक चव्हाण राज्यात परत आल्यास आपल्याला भारी पडतील म्हणून भाजपनेही खेळी खेळली. अशोक चव्हाण यांना राज्यपाल पाठीशी घालत आहेत म्हणून थेट राष्ट्रपतींपर्यंत तक्रार करण्यात आली. तर दिल्लीत राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्र सरकार मेहेरनजर का दाखवत आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने केला. त्यामुळे कॅमेर्‍यासमोर असलेल्या राहुल गांधी यांना महाराष्ट्र सरकार कोणालाही पाठीशी घालत नसल्याचा खुलासा करावा लागला. या आधारावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जे पाहिजे होते तेच साध्य झाले असल्याचेही दिल्लीतील काँग्रेसच्या वतरुळात बोलले गेले.


राहुल गांधी यांना प्रश्न विचारणारा पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे का, याचीही खमंग चर्चा झाली. महाराष्ट्रात आपल्याला आता स्थान नाही म्हणून अशोक चव्हाण यांनी आता लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. एरवी खतगावकरांच्या पाठीशी उभे राहणारे चव्हाण यांनी आता मेहुण्याचे तिकीट कापून आपण स्वत:च नांदेडमधून निवडणूक लढवण्याची रणनीती आखली आहे.


निवडणूकपूर्व सर्वेक्षणात कॉँग्रेसची नांदेडमधील जागा संकटात असल्याचे समोर आले आहे. अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील नेत्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. मात्र, ‘आदर्श’ची आडकाठी आल्यास अशोक चव्हाण लोकसभा उमेदवारीतून बाद होतील; अशा वेळी अमिता चव्हाण यांना तिकीट मिळावे म्हणून चव्हाण प्रयत्न करणार आहेत.


यशस्वी नेतृत्वामागे पत्नीचे श्रम
2009 मधील विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. त्याचे श्रेय त्यांनी पत्नीला दिले होते. त्या वेळी चव्हाण हे मुख्यमंत्री असल्याने नांदेडमध्ये केवळ एकच सभा घेऊ शकले होते, तर त्यांच्या पत्नीने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या बाबीही अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत.