आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections In Delhi,Lieutenant Governor Give Green Signal

दिल्लीमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक, सर्वपक्षीय बैठकीनंतर नायब राज्यपालांचे संकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील आठ महिन्यांपासूनची राजकीय अनिश्चितता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी सोमवारी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांची भेट घेतली. कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार नाही, तिन्ही पक्षांना नव्याने निवडणुका हव्या आहेत, असे या भेटीनंतर उपराज्यपाल कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
तिन्ही राजकीय पक्षांशी झालेल्या चर्चेच्या आधारावर उपराज्यपाल केंद्र सरकारला अहवाल पाठवणार आहेत. त्यानंतरच दिल्ली विधानसभेची बरखास्ती आणि निवडणूक जाहीर करण्याची औपचारिकता पूर्ण होऊ शकेल.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी जंग यांची भेट घेतली. आमचा पक्ष सरकार स्थापण्याच्या स्थितीत नाही, असे पत्र जंग यांच्याकडे या नेत्यांनी सोपवले.
विधानसभा बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसचे नेते हारूण युसूफ म्हणाले की, झारखंड व जम्मू- काश्मीरसोबतच दिल्लीतही निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. आप नेते अरविंद केजरीवाल व मनीष शिसोदिया यांनी जंग यांची भेट घेतली.या स्थितीत निवडणूक हाच पर्याय आहे, असे शिसोदिया यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या ताशे-यानंतर सुरू झाली चर्चा
सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर उपराज्यपालांनी चर्चा सुरू केली होती. ‘आप’च्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने, ‘ राज्यात नेहमीसाठी तर राष्ट्रपती राजवट राहू शकत नाही’ अशा शब्दांत फटकारले होते. अरविंद केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारीला राजीनामा दिल्यानंतर १७ फेब्रुवारीला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

तीन जागांवरील पोटनिवडणूक रद्द होणे शक्य
भाजपच्या तीन आमदारांची लोकसभेवर निवड झाली आहे. त्यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेतील सदस्य संख्या ६७ झाली. या ३ जागांवरील पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर आहे. उपराज्यपालांच्या शिफारशीनंतर केंद्राने विधानसभा बरखास्त केली तर ही प्रक्रिया रद्द होईल.

मोदीच असतील भाजपचा चेहरा
भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र व हरियाणातील यशामुळे पक्षात उत्साह आहे. देशात नरेंद्र मोदी यांची लाट अद्याप कायम आहे. या राज्यातील विजयाने मोदी लाटेवर शिक्कामोर्तब झाल्याचे पक्षातील नेत्यांना वाटते. यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदी हेच पक्षाचा चेहरा असतील.

दिल्लीतील सध्याची स्थिती
०८ काँग्रेस
२९ भाजप
०३ इतर
२७ आप
(टीप : इतरमध्ये आपमधून निलंबित विनोद बिन्नी यांचा समावेश)