आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ASSOCHAM The Associated Chambers Of Commerce And Industry Of India Want High GDP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्षेत्रीय निधी केंद्रांद्वारे व्हावे कृषी उत्पादनाचे ब्रँडिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय आर्थिक विकासाचा दर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याची ताकद व लक्षावधी रोजगाराच्या संधी असलेल्या कृषी क्षेत्राकडे एनडीए सरकारने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असे मत असोचेम या संघटनेने व्यक्त केले आहे. त्यासाठी असोचेमने काही उपायही सरकारला सुचवले आहेत. धोरणात्मक स्पष्टता, नव्या तंत्राचा अवलंब, मागणी-पुरवठय़ाचा समतोल आणि गुंतवणुकीला चालना व अन्नधान्य सुरक्षा अवलंबल्यास कृषी क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल, असे असोचेमला वाटते. भारतीय ब्रँड स्थापन करण्यासाठी भौगोलिक वैशिष्ट्ये असणार्‍या कृषी उत्पादनाच्या नावाने क्षेत्रीय निधी केंद्रे (जीएएफ) स्थापन करण्याचे असोचेमने सुचवले आहे.
असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांनी यासंदर्भात सांगितले की, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर केंद्रित सुसूत्रता असणारे धोरण, संशोधन आणि विकासावर विश्वास दर्शवणारे व अत्याधुनिक तंत्राला वाव असणारे धोरण अवलंबल्यास अन्न सुरक्षेचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. तसेच देशाचा कृषी-व्यापार जगाशी स्पर्धा करू शकेल. कृषी उत्पादन बाजाराला चालना देण्यासाठी सर्व राज्यांत कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यक आहे. असे केल्याने मागणी-पुरवठय़ाचे समीकरण संतुलित होईल. शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कमी खर्चाचे कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
याशिवाय शेतकर्‍यांना मिळणारे अनुदान थेट खात्यात जमा व्हावे. अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी त्या क्षेत्रात खासगी तसेच विदेशी गुंतवणुकीला मुभा द्यावी, असेही असोचेमने सुचवले आहे.

रोजगार निर्मितीसाठी उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर), फलोत्पादनशास्त्र, मत्स्यविज्ञान, कुक्कुटपालन आणि दुग्धोत्पादन या क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे असोचेमला वाटते.
सुसंवाद हवा : शेतकरी आणि प्रयोगशाळा यांत सुसंवाद असावा यासाठी सरकारने ब्रॉडब्रँड जोडणीसह क्षेत्रीय किसान टीव्ही वाहिनी सुरू करून सर्व माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावी, असे असोचेमने सुचवले आहे.

क्षेत्रीय निधी केंद्रे स्थापन करा
भारतीय ब्रँड स्थापन करण्यासाठी भौगोलिक वैशिष्ट्ये असणार्‍या कृषी उत्पादनाच्या नावाने क्षेत्रीय निधी केंद्रे (जीएएफ) स्थापन करण्याचे असोचेमने सुचवले आहे. दाजिर्लिंगचा चहा, नागपूरची संत्री, रत्नागिरीचा हापूस या ब्रँडच्या विकासासाठी त्यामुळे मदत होईल.

कडधान्ये, गळीत धान्याकडे लक्ष हवे
कृषी क्षेत्रातील दीर्घकालीन उपायांसाठी असोचेमने कडधान्ये व गळीत धान्याच्या उत्पादनवाढीसाठी चांगले धोरण आणि तंत्रज्ञानावर भर देण्याचे सुचवले आहे. यामुळे आयातीचा खर्च कमी होऊन विकासाला गती येईल. काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी तंत्राचा वापर व प्रक्रिया उद्योगांची उभारणीकडे लक्ष देण्याचे सुचवले आहे.