आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायली मुत्सद्द्यांकडून भारतीय अधिकार्‍यावर हल्ला; तीन अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील तीन इस्रायली मुत्सद्द्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्थलांतर अधिकार्‍यांवर हल्ला करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र या मुत्सद्द्यांना राजनयिक संरक्षण असल्यामुळे त्यांना अटक करता आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भारतात अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काउंटरवर खूप गर्दी असल्यामुळे या तीन तरुण मुत्सद्द्यांना स्थलांतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर सोमवीर नामक अधिकार्‍याने त्यांचे काम हाती घेतले, तेव्हा तिघांपैकी एकाने अधिकार्‍याच्या कानशिलात लगावली.
या भांडणात इतर दोन अधिकार्‍यांनीही हाणामारी केली. विमानतळ अधिकार्‍यांनी पोलिसांना कळवल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या चौकशीदरम्यान, आपण इस्रायली मुत्सद्दी कामानिमित्त नेपाळला जात असल्याचे तरुणांनी सांगितले. हा सर्व प्रकार विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून ही रेकॉर्डिंग सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
असे पहिलेच प्रकरण
अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे. कायदे आणि नियमानुसार चौकशी करण्यात येईल. परराष्ट्र मंत्रालय आणि इस्रायली दूतावासाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याबाबत आता मंत्रालयच निर्णय घेईल. राजनीतिक संरक्षण असल्यामुळे त्यांना अटक करता आली नाही, असे पोलिस उपायुक्त एम. आय. हैदर यांनी सांगितले.
या कलमान्वये गुन्हा
०186 : सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे.
०332 : सरकारी कर्मचार्‍यावर हल्ला करून इजा पोहोचवणे.