आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांना चोहीकडून घेरले, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल त्यांच्यावर चोहीकडून होणा-या टीकेने घेरले आहेत. भाजपचे दिल्ली शाखेचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन करणारी नोटीस जारी झाली आहे. त्यावर २० जानेवारी दुपारपर्यंत त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. दुसरीकडे अमित शहा, काँग्रेसचे निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष अजय माकन यांनी केजरीवाल खोटारडे असल्याचा आरोप
केला आहे.

केजरीवाल यांनी १४ जानेवारी रोजी उपाध्याय आणि आशिष सूद यांच्यावर वीज कंपन्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपने आयोगाकडे तक्रार केली होती. केजरीवाल खोटारडे, बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे पक्षाने म्हटले होते. त्यावर निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली. त्यात केजरीवाल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. खोटे बोलण्याची सवय असल्याने असा माणूस आमचा मुकाबला करू शकत नाही, असे अमित शहा म्हणाले.

बेदींच्या प्रवेशाने नाराज नाही : संघ
नवी दिल्ली । किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही नाराज झालेलो नाहीत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले. बेदींच्या भाजप प्रवेशावरून सरसंघचालक मोहन भागवत नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्याचबरोबर मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर वैद्य यांना हे स्पष्टीकरण द्यावे लागले.

लाज वाचवण्यासाठी बेदींना आणले : आप
आम आदमी पार्टीने भाजपवर पलटवार केला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पक्षावर नाचक्की ओढवली होती. ती लाज वाचवण्यासाठी किरण बेदींना आणण्यात आले आहे. मोदी आणि केजरीवाल यांच्यात बेदी कुशनचे काम करतील, असे आपचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर भाजपने यू टर्न केल्याचा आरोप आशुतोष आणि संजयसिंह यांनी केला आहे.