आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पत्रकार खुशवंतसिंग यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार खुशवंतसिंग यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2 फेब्रुवारी 1915 मध्ये जन्मलेले खुशवंतसिंग यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. 'ए ट्रेन टू पाकिस्तान' यासह त्यांची अनेक पुस्तके प्रसि्द्ध आहेत.
शेवटच्या क्षणी त्याचे चिरंजीव आणि पत्रकार राहुलसिंग आणि मुलगी मीना या त्यांच्या सोबत होत्या. एक पत्रकार, स्तंभलेखक आणि खुमासदार शैलीतील लेखक म्हणून ते देशासह जगात प्रसिद्ध होते. त्यांना राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले होते.
1980 ते 1986 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. हिंदूस्थान टाइम्स आणि इलेस्ट्रेडेट विकलीचे ते संपादक होते.
श्वास घेण्यास त्रास होत होता
खुशवंतसिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, असे त्यांचे पुत्र राहुल यांनी सांगितले. वाढत्या वयामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. आज सकाळी त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली, त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. अशक्तपणामुळे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राहुल म्हणाले, आज सकाळी त्यांनी वृत्तपत्रे आणि काही पुस्तके वाचली.
जन्म आणि शिक्षण
खुशवंतसिंग यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1915 रोजी पंजाबमधील हदाली (आता पाकिस्तानमध्ये) येथे झाला होता. त्यांचे वडील सर सोभासिंग हे त्याकाळातील नावाजलेले ठेकेदार होते. तेव्हा सोभासिंग यांना अर्ध्या दिल्लीचे मालक म्हटले जात होते.
खुशवंतसिंग यांनी लाहोर येथील गव्हर्नमेंट कॉलेज आणि कॅब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यानंतर कायद्याच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तेथून परतल्यानंतर लाहोरमध्ये त्यांनी वकीली सुरु केली. कवल मलिक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या मुलाचे नाव राहुल आणि मुलीचे मीना आहे.
करिअर
खुशवंतसिंग यांनी पत्रकारितेत मोठी प्रसिद्धी मिळाली. 1947 पासून पुढे काही वर्षे ते परराष्ट्र मंत्रालयात महत्त्वाच्या पदावर होते. 1951 मध्ये त्यांनी आकाशवाणीसोबत जोडले गेले. 1951 ते 1953 पर्यंत ते भारत सरकारच्या 'योजना' नियतकालिकाचे संपादक होते. त्याशिवाय मुंबईतून प्रकाशित होणारे इंग्रजी साप्ताहिक इलेस्ट्रेडेटचे संपादक होते. याशिवाय 1983 पर्यंत हिंदूस्थान टाइम्सचेही ते संपादक होते.
साहित्य
'दिल्ली', 'ट्रेन टू पाकिस्तान', 'दि कंपनी ऑफ वूमन', 'आय शाल नॉट हिअर द नाइटिंगल' याशिवाय वर्तमानावर भाष्य करणारे त्यांनी विपूल लेखन केले. 'सिख्खों का इतिहास' हे दोन खंडातील त्यांचे प्रसिद्ध पुस्तक. 95 वर्षांचे असताना त्यांनी 'द सनसेट क्लब' ही कादंबरी लिहिली. 'सच, प्यार और थोडीसी शरारत' ही त्यांची आत्मकथा 2000 मध्ये प्रकाशित झाली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही ते सक्रिय होते. गेल्या वर्षी त्यांचे 'खुशवंतनामा: दि लेसन्स ऑफ माय लाइफ' प्रकाशित झाले होते.