आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान इंधनापेक्षाही पेट्रोल झाले महाग! वाचा का बिघडले गणित?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पेट्रोलवर केंद्राने भरमसाट अबकारी कर लादल्याने पेट्रोलचे भाव पहिल्यांदाच विमानाच्या सुपर जेट फ्युएलपेक्षा (एटीएफ) जास्त झाले.
दिल्लीत पेट्रोल ५८.९१ रुपये आहे. पेट्रोलपेक्षा जास्त ऑक्टेन व पेट्रोलपेक्षाही लवकर उडून जाणारे विमान इंजिनाचे इंधन मात्र ५२.४२ रुपये लिटर आहे. पेट्रोलची गुणवत्ता एटीएफपेक्षा कमी असल्याने त्याचे दरही कमीच असतात. मात्र केंद्राने तीन महिन्यांतच चार वेळा अबकारी कर वाढवल्याने चक्र उलटे फिरले.
आणि एटीएफपेक्षाही पेट्रोल महाग झाले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या तपशीलानुसार, सरकारने पहिल्यांदाच पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त केले तेव्हा एप्रिल २००२ मध्ये पेट्रोलवर प्रतिलिटर १०.५३ रुपये अबकारी कर होता. मे २००५ मध्ये सरकारने पेट्रोलच्या किंमती पुन्हा स्वत:च्या नियंत्रणात घेतल्या तेव्हा हा कर १४.५९ रुपयांपर्यंत वाढवण्यात आला होता. २०१२ मध्ये सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात कपात करून तो ९. ४८ रुपये प्रतिलिटर केला.

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत झपाट्याने घसरण झाल्यामुळे पेट्रोलच्या दरात ९ वेळा कपात करण्यात आली. प्रतिलिटर मागे ही एकंदर कपात १४.६९ रुपये आहे. ही दर कपात मोठी असली तरीही केंद्र सरकारने १२ नोव्हेंबर रोजी १.५० रुपये, २ डिसेंबर रोजी २.२५ रुपये आणि २ व १६ जानेवारी रोजी प्रत्येकी प्रतिलिटर २ रुपयेअबकारी कर वाढवला.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्याचा देशातील पेट्रोल ग्राहकांना थेट फायदा होऊ न देता वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात वाढ केली. त्यातून ९४,१६४ कोटी रुपये म्हणजेच एकूण अबकारी महसुलाच्या ५२ टक्के रक्कम गोळा केली. अबकारी करात वाढ केल्यामुळे या आर्थिक वर्षात सरकारला आणखी १८००० कोटी रुपये मिळणार आहेत.

का बिघडले गणित?
केंद्र पेट्रोलवर प्रतिलिटर ८.९५ रुपये मूळ अबकारी, ६ रुपये विशेष अबकारी कर व २ रुपये अतिरिक्त अबकारी कर वसूल करते. तीन महिन्यांत चार वेळा ७. ७५ रुपये कर वाढवल्यामुळे पेट्रोल महाग झाले आहे.

अबकारी कर असा
*१६.९५ रुपये/लिटर पेट्रोलवर
*९.९६ रुपये/लिटर डिझेलवर
*८ % विमान इंधनावर प्रतिलिटर
*७.७५ रुपये तीन महिन्यांत पेट्रोलवरील अबकारी करात वाढ