आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्येत मंदिर बांधावे, मशिदीला पर्यायी जागा द्यावी: शिया बोर्डाचे सुप्रीम कोर्टात शपथपत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. - Divya Marathi
सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.
नवी दिल्ली- अयोध्या वादावर सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू होण्याच्या तीन दिवसांआधीच नवे वळण लागले. शिया वक्फ बोर्डाने मंगळवारी सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल करून वादग्रस्त वास्तू आमचीच असल्याचा दावा केला आहे. अलाहाबाद हायकोर्ट आणि सर्वाेच्च न्यायालयात आजवर सुनावणीपासून लांबच राहिलेल्या शिया बोर्डाचे हे पहिलेच शपथपत्र आहे. यात बोर्डाने म्हटले आहे की, ‘वादग्रस्त वास्तू ही आमचीच मालमत्ता आहे. त्याच्याशी निगडित निर्णय आम्हीच घेऊत. वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जावे. मशिदीसाठी आम्हाला मुस्लिमबहुल क्षेत्रात जमीन दिली जावी.’ 

शपथपत्रात दावा : वादग्रस्त वास्तूवर सुन्नी बोर्डाचा दावा चुकीचा, शियापंथीयानेच उभारली होती मशीद
अयोध्येत वादग्रस्त वास्तूवर सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा चुकीचा आहे. ही मशीद मीर बकी यांनी उभारली. ते शिया होते. मशिदीच्या उभारणीनंतर जितकेही मुतव्वली झाले ते सर्व शिया बोर्डाचेच होते. बादशहा बाबर तर कधीच अयोध्येला गेले नव्हते. बाबरनाम्यातही याबाबत काेणताही उल्लेख सापडत नाही. त्यामुळे बाबरी मशिदीवर केवळ शियांचा हक्क आहे. यासंबंधित निर्णय फक्त शिया बोर्डच घेईल.

वाद टाळण्यासाठी मुस्लिमबहुल भागात मशीद
शिया बोर्डानुसार, या वादात उत्तर प्रदेशातील सुन्नी बोर्डाला पक्षकार करणे चुकीचे आहे. शांततापूर्ण तोडग्यासाठी मंदिर उभारण्यात यावे. मशिदीसाठी मुस्लिमबहुल भागात कुठेही जागा दिली जावी. जर वादग्रस्त जमिनीवर मंदिर-मशिदीची उभारणी केली तर भविष्यातही वाद उद््भवण्याची शक्यता कायम राहील. वादावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली जावी.

विशेष म्हणजे, ३० सप्टेंबर २०१० ला अलाहाबाद हायकोर्टाने वादग्रस्त जागेला राम जन्मभूमी न्यास, निर्माेही आखाडा आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड या तीन पक्षकारांत वाटून देण्याचा निकाल दिला होता. 

या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाचे तीन सदस्यीय खंडपीठ ११ ऑगस्टपासून सुनावणी करणार आहे. शिया बोर्ड या प्रकरणात प्रतिवादी क्रमांक २४ आहे. अलाहाबाद हायकोर्टात बोर्ड गैरहजर राहिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटिसा जारी केल्या आहेत. त्याला उत्तरादखल शिया बोर्डाने मंगळवारी शपथपत्र दाखल केले आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...