आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीकरांवर ‘आप’बीती;मेट्रो-बस वाहतूक कोलमडली; आम आदमी बेहाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनामुळे चारही मेट्रो स्थानके बंद करणे भाग पडल्यामुळे सामान्य दिल्लीकरांची तारांबळ उडाली आहे. अनेक मार्गांवरील बस वाहतूक वळवण्यात आल्यामुळे चाकरमान्यांना सलग दुस-या दिवशी नाहक त्रास सोसावा लागला. मंगळवारी दिल्लीत पाऊस पडल्यामुळे राजधानीतील अडचणीत आणखी भर पडली आहे. केजरीवाल आणि कंपनीने रेल भवन या मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन करण्याऐवजी जंतर मंतरवर धरणे आंदोलन करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त झाली. दोन दिवसांत ओढवलेली आपबीती सांगताना आम आदमी, चाकरमानी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहेत. पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन आणि रेस कोर्स ही चार मेट्रो स्थानके सकाळी 6.00 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली. बदरपूर ते केंद्रीय सचिवालयादरम्यान लेन क्रमांक सहावर धावणारी रेल्वेसेवा खान मार्केट मेट्रो स्थानकापर्यंत बंद करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या निर्देशानंतर डीएमआरसीने मेट्रो सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
नियमित बस वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याने केंद्रीय सचिवालय, शास्त्री भवन, रेल भवन, संसद, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक येथे काम करणा-या कर्मचा-यांना पायी कार्यालय गाठणे भाग पडले. कार्यालयात येण्यासाठी खान मार्केटपासून 4 कि.मी. अंतर चालत आल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ सरकारी अधिका-याने दिली.
केजरीवाल सरकार बरखास्त करा - किरण बेदी
दिल्लीतील ‘आप’बीतीनंतर राज्यातील अरविंद केजरीवाल यांचे सरकार तत्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी केजरीवाल यांच्या एकेकाळी सहकारी राहिलेल्या आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी केली आहे. लोकांकडून निवडून सत्तेवर असलेले सरकार स्वत:च अराजक स्थिती निर्माण करत आहे. त्यामुळे वेळेचा थोडाही अपव्यय न होऊ देता राष्ट्रपतींनी केजरीवाल यांचे सरकार बरखास्त केले पाहिजे. टीम अण्णाच्या सदस्य असलेल्या बेदी यांनी ट्विटरवर ही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल हे अराजकवादी असल्याचा आरोपही बेदी यांनी केला.
जनतेच्या त्रासाला गृहमंत्री शिंदे जबाबदार
गृहमंत्री शिंदे यांनी मेट्रो स्थानके बंद करण्यास सांगितले आहेत. त्यामुळे लोकांच्या त्रासाला तेच जबाबदार आहेत. मेट्रो अधिका-यांना सेवा नियमित करण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी सेवा रोखल्यामुळे आम्ही काही करू शकत नसल्याचे मेट्रोचे अधिकारी म्हणाले. शिंदे यांनी आमच्यासाठी नव्हे, तर सामान्य लोकांचीही गैरसोय केली आहे. त्यांनी मेट्रो स्थानके बंद केली आहेत.- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली