आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली- राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाके विक्रीवर तत्काळ बंदी, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सध्याच्या लग्नसराईत वायुप्रदूषण रोखण्यासाठी कठोर पाऊल म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सर्व फटाके विक्रेत्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत तत्काळ रद्द केले. त्यामुळे फटाक्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आली आहे.

सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती ए. के. सिकरी व न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या न्यायपीठाने हा आदेश देताना म्हटले आहे की, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढील आदेशापर्यंत फटाके बाळगणे, साठा करणे आणि विक्री रोखण्याचे निर्देश आम्ही देत आहोत. सार्वजनिक हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत अशा परवान्यांचे नूतनीकरण करू नये, असे निर्देशही न्यायपीठाने केंद्र सरकारला दिले. फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामुळे होणाऱ्या धोकादायक परिणामांचा अभ्यास करून सहा महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (सीपीसीबी) दिले. परवान्यांचे तत्काळ निलंबन म्हणजे दिल्ली तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांची विक्री, खरेदी आणि साठा करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावरील आदेश राखून ठेवला होता. फटाक्यांची आतषबाजी हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. त्यामुळे एकानंतर एक असे पाऊल उचलले जाईल. त्यानंतर ज्याची अंमलबजावणी होऊ शकेल, असा योग्य आदेश दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात नवे परवाने देण्यात येऊ नये आणि सध्याच्या परवान्यांचे नूतनीकरण करू नये किंवा सध्याचे परवानेच रद्द करावेत, असा आदेश देण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. संशोधन न करता आणि फटाक्यांवर बंदीचा हवेची गुणवत्ता, आरोग्य आणि जीवनशैली यावर काय परिणाम होईल यांच्या अहवालांचा अभ्यास केल्याशिवाय आम्ही अंतिम आदेश देणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
फटाक्यांचे परवाने रद्द करण्यासाठी सरकारला कालमर्यादा घालून द्यावी आणि फटाके बाळगणे, साठा करणे आणि विक्री करणे यासाठी परवान्यांचे नूतनीकरण करू नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायपीठाकडे केली होती. फटाक्यांमुळे मोठे प्रदूषण होते. त्यामुळे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांवर बंदी घालावी, अशी त्यांची मागणी होती.

फटाक्यांची आतषबाजी म्हणजे पैसा जाळणेच
फटाक्यांची आतषबाजी करणे याचा अर्थ पैसा जाळणे असाच होतो. या फटाक्यांमुळे मानवावर एवढा दुष्परिणाम होतो तर मग ज्यांचे कान मानवापेक्षा जास्त संवेदनशील असतात अशा कुत्र्यांवर त्याचा किती परिणाम होत असेल, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली होती. दिल्लीत ३० टक्के मुलांना अस्थमाचा त्रास असल्याचे विविध अहवाल सांगतात. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर पावले उचलण्याची गरज आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.
बातम्या आणखी आहेत...