आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोरा’ वादळ बांगलादेशात धडकले, भारतावरही धोक्याचे सावट,10 जिल्ह्यांना तडाखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - श्रीलंकेमध्ये रौद्ररूप दाखवल्यानंतर “मोरा’ हे चक्रीवादळ लवकरच भारतात रौद्ररूप दाखवण्याची शक्यता आहे. मंगळवारी हे वादळ बांगलादेशमध्ये येऊन धडकले. हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीतील त्याच्या सध्याच्या स्थितीतून उत्तर आणि उत्तर-पूर्वच्या दिशेने वेगाने सरकत आहे. मंगळवारी त्याने बांगलादेशच्या चटगावमध्ये हजेरी लावली असून या भागात सध्या ताशी १५० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या सुमारे ३ लाख नागरिकांना बचाव पथकाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती उद््भवल्यास बांगलादेशमध्ये लागलीच मदत पोहोचवली जावी यासाठी भारतीय नौदलही सज्ज झाले आहे. बांगलादेशच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चटगाव आणि कॉक्स बाजारातील बंदरांवर चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या भागात मंगळवारी दुपारी  किंवा बुधवारी सकाळपर्यंत हे वादळ पोहोचण्याची दाट शक्यता आहे.  
 
सर्व विमानांचे उड्डाण रद्द  : चक्रीवादळाच्या धास्तीमुळे चितगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि काॅक्स बाजार विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत. बांगलादेशच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे अतिरिक्त सचिव गुलाम मुस्तफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३ लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 
 
१० जिल्ह्यांना तडाखा  
काॅक्स बाजार, चितगाव, नौखाली, लक्ष्मीपूर, फेनी, चांदपूर, बर्गुना, पतुआखाली, भोला, बरीसाल आणि पिरोजपूर या १० जिल्ह्यांमध्ये या वादळाचा अधिक तडाखा बसू शकतो. मोरामुळे समुद्रात सुमारे ४ ते ५ फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मागच्या वर्षी बांगलादेशच्या दक्षिण समुद्रात आलेल्या रोआनू वादळात २० जणांचा मृत्यू झाला होता.
 
कोलंबो - श्रीलंकेत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात १९४ नागरिक बळी गेले तर ९४ बेपत्ता आहेत. येथे पूरसदृश स्थिती असून विहिरीही दूषित झाल्या आहेत. शुद्ध पेयजलाची कमतरता जाणवत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ६ लाख नागरिकांना स्थलांतर करावे लागले असून ११२ जण जखमी असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. मान्सूनच्या तडाख्याने दूषित झालेल्या विहिरी स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले. ४० % नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध नसल्याचे जलपुरवठा मंत्री रऊफ हकीम यांनी सांगितले.  नैऋत्य श्रीलंकेतील १ लाख ४२ हजार ८११ कुटुंबांना याची झळ बसली आहे. १४ जिल्ह्यांतील जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. ११० नागरिक बेपत्ता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...