आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँक कर्मचारी : कर्करोग, गरोदरपण व शस्त्रक्रिया होऊनही सेवेत तत्पर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात ५०० व १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर नव्या नोटा सहजपणे उपलब्ध होत नसल्याने लोकांना त्रास होतो आहे. कॅन्सर, गरोदरपणा आणि ऑपरेशन झालेले असूनही बँक कर्मचारी दिवसरात्र एक करून लोकांना रक्कम देण्याच्या कामात व्यग्र आहेत. दिव्य मराठी नेटवर्कने बँक कर्मचाऱ्यांची कामावरील निष्ठा आणि चिकाटी हे गुण दर्शवणाऱ्या घटनांचे चित्रण केले आहे.
अजमेर येथील आयडीबीआय बँकेचे सहायक व्यवस्थापक मनीष सिंघल गेल्या अडीच महिन्यांपासून फुप्फुसाच्या संसर्गाने आजारी आहेत. अडीच महिन्यांपासून ते रजेवर होते. पण नोटबंदीच्या काळात आजारपण विसरून रोज सकाळी ९ ते रात्री ९. ३० अशी सेवा ते देत आहेत.

शस्त्रक्रिया होऊनही रोखपाल म्हणून काम : अॅक्सिस बँकेत कार्यरत असलेले वीरेंद्रकुमार श्योपुरा यांच्या पाठीची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांना जास्त वेळ बसणे आणि उभे राहण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. नोटबंदीनंतर त्यांनी आपल्या रजा रद्द करून अतिरिक्त रोखपाल म्हणून १२ नोव्हेंबरपासून काम सुुरू केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते दर एक तासाने उभे राहून ग्राहकांना सेवा देत आहेत. सतत १२ तास ते काम करत आहेत.

८ डिसेंबरचे लग्न, ५ ला जाणार नवरदेव
बांसवाडा युनियन बँकेत क्लिअरन्सचे काम करणारे गौरव पराते मूळचे भोपाळचे रहिवासी आहेत. त्यांचे लग्न ८ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी त्यांना १५ नोव्हेंबरपासून सुट्या देण्यात आल्या आहेत. तरीही ते कामावर आहेत. काम इतके वाढले की लग्नाची सगळी खरेदी ऑनलाइन करतो आहे. बँकेतील गर्दी पाहून त्यांनी ५ डिसेंबरला लग्नासाठी भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला. तर बंगळुरूमध्ये विजया बँकेत नोकरीस असलेल्या काजल दुबेचे लग्न ९ डिसेंबरला पाटण्यात आहे. परंतु नोटबंदीमुळे बँकेत कामे करण्यात गर्क आहेत.

गर्भवतीला कामाचाच ध्यास
ग्वाल्हेरच्या युको बँकेत सहायक व्यवस्थापक असलेल्या वर्षा तोमर या ८ महिन्यांच्या गर्भवती आहेत. तरीही त्या रोज १२ तास काम करत आहेत. खूप वेळ एकाच जागी बसत असल्याने पाठीचे दुखणे, पायावर सूज इत्यादी त्रास जाणवतो आहे. बँकेचे काम वेळेवर पूर्ण करण्याचाच ध्यास त्यांना लागला आहे.

४ विद्यार्थी करताहेत मदत
सोलापूर येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील ४५० मुले बँकेत लोकांना मदत करण्यास जात आहेत. जे ग्राहक लांब रांगेत थांबून कंटाळले असतील त्यांच्या जागी ही मुले उभी राहतात. काही लोकांना पासबुक, बँकेत फॉर्म जमा करण्यासाठी मदत करतात.

(फोटो : सोलापुरात विद्यार्थी बँकेच्या कामात मदत करतात.)
बातम्या आणखी आहेत...