आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे लाचखोरी प्रकरणी बन्सल देणार भाच्याविरुद्ध साक्ष, सीबीआयच्या यादीत 90 साक्षीदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वेतील बढतीसाठी लाचखोरीप्रकरणी सीबीआयने माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना साक्षीदार केले आहे. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आपला भाचा विजय सिंगलाच्या विरोधात ते साक्ष देतील.


बन्सल यांना साक्षीदारांच्या यादीत 39 व्या स्थानी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात सिंगला, तत्कालीन रेल्वे बोर्ड सदस्य महेशकुमार आणि इतर आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे. विविध कलमान्वये त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. सीबीआयने 2 मे रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सिंगला यास चंदिगड येथील आपल्या कार्यालयात 90 लाख
रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. सिंगला याच्या प्रभावामुळेच महेशकुमार यास हव्या त्या पदावर नियुक्त करण्यात आले होते. आरोपपत्रात नावे असलेल्या दहापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांनी गुरुवारी अटकेतील आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 11 जुलैपर्यंत वाढ केली आहे. इतर दोन आरोपींना 11 जुलैपर्यंत हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आले आहेत.


भाजपची आठवडाभर निदर्शने
रेल्वे लाचखोरीप्रकरणी सीबीआयने माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना आरोपी न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने चंदिगड या पवनकुमार बन्सल यांच्या मतदारसंघात काळा आठवडा पाळण्याचे जाहीर केले आहे. या आठवड्यात बन्सल जेथे जेथे जातील तेथे तेथे भाजप कार्यकर्ते त्यांना काळे झेंडे दाखवणार आहेत. चंदिगड भाजप अध्यक्ष संजय टंडन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.