आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुटीनंतर बॉक्सर विजेंद्रसिंगचे कमबॅक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ड्रग्ज स्कँडलच्या वादळात तावून सुलाखून निघालेला बॉक्सर विजेंद्रसिंग अखेर सुटीवरून परतला आहे. जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पतियाळा येथे मंगळवारपासून (दि. 27) सुरू होणा-या तीनदिवसीय सराव शिबिरात तो भाग घेणार आहे. त्याच्या सहभागाबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. ड्रग्ज प्रकरणातील कथित सहभाग आणि त्यानंतर सुटीवर गेल्यामुळे या पदक विजेता बॉक्सरच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र विजेंद्रने आपण उपलब्ध असल्याचे जाहीर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


काही वैयक्तिक कामाकरता आपण सुटी घेतली होती. प्रशिक्षक आणि वरिष्ठांना हे माहीत होते. सुटी घेण्यापूर्वी संबंधित अधिका-यांची परवानगी घेतली होती. आता परत आलोय, असे विजेंद्रने सांगितले. कोणत्या वजनी गटातून
लढणार याबाबत त्याने संदिग्धता कायम ठेवली आहे.


विजेंद्रने ऑलिम्पिकमध्ये 75 किलो वजनी गटात पदक जिंकले होते. तो हाच वजनगट निवडणार की 81 किलो वजनी गटातून लढणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. खुद्द विजेंद्रनेही याविषयी काहीच स्पष्ट केले नाही.


तीनदिवसीय सराव शिबिर पतियाळात
दरम्यान, पतियाळा येथे आजपासून तीनदिवसीय सराव शिबिराला प्रारंभ होणार आहे. हे शिबिर 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान होणे प्रस्तावित होते. मात्र, ते पुढे ढकलण्यात आले. त्याचे नेमके कारण ‘आयबीएफ’ने स्पष्ट केले नव्हते. या शिबिरादरम्यान जागतिक स्पर्धेसाठी संघातील स्थान पक्के करायचा प्रत्येक बॉक्सरचा प्रयत्न राहील.