आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ......पश्चिम घाटाचाही उत्तराखंड होईल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वैज्ञानिकांनी दिलेले सल्ले विचारात घेऊन सरकारने वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या असत्या तर उत्तराखंडमध्ये निसर्गाचा महाप्रलय घडला नसता. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे सरकारी यंत्रणेकडून असेच दुर्लक्ष होत राहिले तर देशाच्या जैवविध संपत्तीचा मोठा हिस्सा असलेल्या पश्चिम घाटातही उत्तराखंडसारखी भीषण नैसर्गिक आपत्ती घडू शकतात, असा इशारा प्रख्यात इतिहासकार, अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी दिला.

मध्य प्रदेश फाउंडेशनद्वारे राजधानी दिल्लीत ‘हीरोज ऑफ उत्तराखंड’ व ‘उत्तराखंड दुर्घटनेचा बोध’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत गुहा बोलत होते. या कार्यक्रमात उत्तराखंडचे राज्यपाल अजीज कुरेशी, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह, अँड. विवेक तनखा यांची उपस्थिती होती. गुहा म्हणाले की, ‘उत्तराखंडमध्ये 1970 व 1985 मध्ये प्रचंड मोठे महापूर आले होते. प्रशासनाने तो इतिहास लक्षात घेतला असता तर आता इतके मोठे नैसर्गिक संकट आले नसते. वैज्ञानिकांनी 2000 मध्ये अलकनंदा नदीबाबत सविस्तर अहवाल आणि सूचना शासनाला सादर केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचे परिणाम या दुर्घटनेच्या रुपाने भोगावे लागले. उत्तराखंडमध्ये यात्रेकरूंऐवजी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम पर्यावरण संतुलनावर झाला आहे.’

दिग्विजयसिंह यांनी गुहा यांचे विश्लेषण मान्य केले. केदारनाथ येथे मनाई असणार्‍या क्षेत्रात पर्यटकांची रेलचेल, नदीकाठावरील शहरीकरण, अवैध उत्खनन व इतर कारणांमुळे ही दुर्घटना घडलेली असू शकते. नैसर्गिक संवर्धनासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करावा. जेणेकरून अशा संकटांची पूर्वसूचना आपल्याला वेळेआधीच मिळू शकेल. त्यासाठी व्यापक योजना तयार करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
चाका गावाचे अस्तित्वच धोक्यात
डेहराडून । उत्तराखंडमधील केदारनाथ परिसरात 16 व 17 जून रोजी आलेल्या महाप्रलयामुळे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील चाका (ता.जखोली) गावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मंदाकिनी नदीचा किनारा वाहून गेल्यामुळे या भागातील अनेक घरे पुरासोबत वाहून गेली, तर बहुतांश घरांना तडे गेले आहेत. मंदाकिनी नदीचे पात्र सातत्याने रुंदावत असल्याने उर्वरित घरेही वाहून जाण्याची भीती असल्याने या गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.