नवी दिल्ली - किचकट आकडेमोड आणि अर्थसंकल्प तयार करण्यासाठी घरदार विसरून महिना-पंधरा दिवस अगदी करावे लागणारे अखंड काम यातून विरंगुळा म्हणून दरवर्षी अर्थमंत्रालयातील कर्मचा-यांसाठी ‘हलवा’ उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने यंदा लेखानुदान सादर करण्यात येणार आहे. मात्र, तरीही शुक्रवारी अर्थमंत्रालयात शि-याचा बेत करण्यात आला होता.
अर्थसंकल्पापूर्वी हलवा उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रथा-परंपरा आहे. मोठ्या कढईत हा शिरा (हलवा) तयार करण्यात येतो आणि तो मंत्रालयातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांना वाटण्यात येतो.दरवर्षी अर्थसंकल्प तयार करताना कमालीची गुप्तता पाळली जाते. अर्थसंकल्प तयार करणारे अधिकारी, कर्मचारी, छपाईशी संबंधित कर्मचा-यांना मंत्रालयातच मुक्काम करावा लागतो. या काळात जगाशी त्यांचा संपर्कच नसतो.बाहेरच्या जगाशीच नव्हे, तर कु टुंबीयांशीही संपर्क साधण्यास मनाई असते. फोन, मोबाइल, ई-मेल आदीही वापरता येत नाही. केवळ अतिवरिष्ठ अधिका-यांनाच घरी जाण्याची मुभा असते.
करवाढ नाही
मनमोहन सरकारचा 15 व्या लोकसभेतील हा अखेरचा अर्थसंकल्प आहे. सोमवारी, 17 तारखेला अर्थमंत्री चिदंबरम लेखानुदान सादर करणार असून कररचनेमध्ये फार मोठे बदल होणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.