आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांच्या वक्तव्यावरुन कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी पुन्हा आमने-सामने आले आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीत समाजवादी पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये फक्त 4 जागांवर विजय मिळेल तर कॉंग्रेस कमीत कमी 40 जागा जिंकेल, असा दावा वर्मा यांनी केला. वर्मा यांचे वक्तव्य झोंबल्यामुळे समाजवादी पार्टीनेही प्रतिहल्ला चढविला. वर्मांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका समाजवादी पार्टीचे नेते राम आसरे कुशवाहा यांनी केले आहे.
सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी काल बेनीप्रसाद वर्मांवर टीका केली होती. जे स्वतःच्या मुलाचे डिपॉझिट वाचवू शकले नाही, ते राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्याच्या गोष्टी करीत आहेत, असा टोला मुलायम यांनी वर्मांना लगावला होता. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत वर्मा यांचा मुलगा राकेशचा दारुण पराभव झाला होता. त्याचे डिपॉझिटही जप्त झाले होते. यासंदर्भात मुलायम यांनी मारलेला टोला वर्मांना चांगलाच झोंबला. त्यामुळे त्यांनी प्रत्युत्तर देऊन सपा केवळ 4 जागा जिंकेल, अशी टीका केली.
सपाने वर्मांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. तसेच त्यांचे अंकगणितही कच्चे असल्याचा टोला मारला.
समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक जुगलबंदी सुरु झाल्याचे दिसत आहे. एकीकडे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सपावर अविश्वास व्यक्त केला. तर मुलायम सिंह यादव यांनी युपीए सरकारवर टीका सुरु केली. कॉंग्रेस धोकेबाज असल्याचे मुलायम म्हणाले होते. परंतु, सरकारचा पाठिंबा काढणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.