आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-ओमर 'ट्विट वॉर'; गुगल समिटच्या निमंत्रणावरून पेटले शाब्दिक युद्ध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आघाडीत समजले जातात खरे; परंतु गुगलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'बिग टेंट अँक्टिव्हेट समिट 2013' साठी देण्यात आलेल्या निमंत्रणावरून त्यांच्यात आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात ट्विट वॉर सुरू झाले असून या युद्धात अनेकांनी उडी घेतली आहे.

गुगलने आयोजित केलेल्या 'बिग टेंट अँक्टिव्हेट समिट 2013'मध्ये मोदी सहभागी होणार असल्याचे वृत्त गुजरात सरकारच्या प्रसिद्धी पत्रकाचा हवाला देऊन पीटीआयने दिले होते. येथपर्यंत सर्वकाही ठीक होते; परंतु या प्रतिष्ठित संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळालेले नरेंद्र मोदी हे एकमेव भारतीय मुख्यमंत्री असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात म्हटले होते. त्यानंतर सोशल नेटवर्किंग साइटवर मोदींची चर्चा सुरू झाली. त्यांच्या अभिनंदनाचे अनेक ट्विट होऊ लागले. याच दरम्यान जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले, 'काय गंमत केली जात आहे. गुगल समिटमध्ये बोलावण्यात आलेले नरेंद्र मोदी हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी मलाही निमंत्रण पाठवले आहे.' त्यांच्या या ट्विटवरून ट्विट वॉर सुरू झाले आहे.

संमेलनात सहभागी होण्याबरोबरच गुगल प्लसच्या मदतीने मोदी गुगल इंकचे अध्यक्ष इरिक स्मिथ यांच्याशी चर्चा करणार आहेत. 'राजकारणातील तंत्रज्ञान' या विषयावर होत असलेल्या या संमेलनात गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राचे मुख्य संपादक अँलन रासब्रिजर आणि रही स्टेफिनी कटर याही सहभागी होणार आहेत.