आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhartratan Award Declared To Important Role In Mars Program Dr.CNR Rao

मंगळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका असलेल्या डॉ. सीएनआर राव यांना भारतरत्न जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मंगळ मोहिमेच्या माध्यमातून भारताला अंतराळ विज्ञान क्षेत्रात अत्युच्च प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ प्रो. डॉ. सीएनआर राव (79) यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ बहुमान जाहीर झाला आहे. ते पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत.
घनस्थिती रसायनशास्त्र आणि संरचनात्मक रसायनशास्त्रात जागतिक पातळीवर प्रो. राव यांची ख्याती आहे. त्यांनी आतापर्यंत 1500 शोधप्रबंध सादर केले असून त्यांची 45 पुस्तकेही प्रकाशित आहेत. भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान प्राप्त करणारे ते तिसरे शास्त्रज्ञ आहेत. यापूर्वी नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्राचे अभ्यासक सी. व्ही. रमण (1954) तसेच एरॉनॉटिकल इंजिनिअर एपीजे अब्दुल कलाम (1997) यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले आहे. यातील कलाम हे देशाचे राष्‍ट्रपती होणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत. प्रो. राव यांचे नाव अनेकदा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. त्यांना आंतरराष्‍ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2013 मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. सध्या ते बंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्रात संशोधक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भारत-चीनदरम्यान वैज्ञानिक सहकार्य वाढीसाठी राव यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
आश्चर्याचा धक्काच बसला : राव
भारतरत्न जाहीर झाल्याचे कळताच मला आश्चर्याचा धक्का बसला, अशी प्रतिक्रिया प्रो. राव यांनी दिली. हा बहुमान त्यांनी पत्नी, मुले, आपले विद्यार्थी तसेच अन्य कुटुंबीयांना अर्पण केला. ‘मी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाची वाट पाहत बंगळुरू विमानतळावर थांबलो होतो तेव्हा एका कर्मचा-याने अर्जंट कॉल असल्याचे सांगितले. तो कॉल भारतरत्न जाहीर झाल्याचा होता,’ असे राव यांनी सांगितले.
चिंतामणी नागेशा रामचंद्र राव
प्रो. राव यांचा जन्म 30 जून 1934 रोजी बंगळुरूत झाला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ तसेच पर्ड्यू विद्यापीठातून पीएच. डी. केली होती. ऑक्सफर्ड, पर्ड्यू, नॉस्त्रादेम, बोर्डी, कोलोरॅडो, एएमयूसह अनेक विद्यापीठे, आयआयटी मुंबई, खरगपूर, दिल्ली आणि पाटण्यासह 60 प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. जगातील प्रतिष्ठित संस्थांचे ते सदस्य आहेत.
मंगळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका
भारताने मंगळ मोहीम राबवून मोजक्या देशांत स्थान मिळवले. या 450 कोटी रुपयांच्या मोहिमेत प्रोफेसर राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने महत्त्वाची भूमिका बजावली. हे यान पाठवण्यासाठी ‘इस्रो’ने सूचना मागवल्या होत्या. एकूण 33 सूचनांपैकी राव यांनी 5 स्वीकारल्या. मंगळ ग्रहापर्यंत यान पोहोचण्याच्या दृष्टीने याच सूचना महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. विविध देशांनी आतापर्यंत अशा 51 मोहिमा राबवल्या. यातील 21 मोहिमाच यशस्वी मानल्या जातात. भारताची मोहीम यशस्वी ठरली त्याचे श्रेय प्रो. राव यांना द्यावे लागेल.
स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग
शालेय जीवनाच्या काळात देशभर स्वातंत्र्य चळवळ सुरू होती. या काळात जवाहरलाल नेहरू आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या भाषणांनी प्रो. राव प्रभावित झाले. नंतरच्या काळात त्यांनी काही चळवळीत सहभागही घेतला. भारतरत्न सी. व्ही. रमण यांची भेट घेण्याची मिळालेली संधी ही जीवनातील सर्वांत आनंददायी आठवण असल्याचे राव मानतात.