आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युनियर एडिटर-३च्या विजेत्यांना अण्णांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील लाखो स्पर्धक मुलांमधून निवड झाल्याचा आनंद आणि अण्णा हजारेंसारख्या व्यक्तीकडून पुरस्कार मिळण्याचा उत्साह. मंगळवारी ज्युनियर एडिटर-३ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्या मुलांच्या चेहऱ्यावर हेच भाव दिसत होते.

दैनिक भास्कर समूहाच्या वतीने मुलांमध्ये वृत्तपत्रांविषयी आवड विकसित करण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात ३ लाखांपेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात राष्ट्रीय पातळीवर ४० विजेते घोषित करण्यात आले. त्यांना अण्णा हजारेंच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले गेले. या प्रसंगी अण्णा हजारेंनी त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटाचे पोस्टरही प्रकाशित केले. समारंभात दैनिक भास्करचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनय माहेश्वरी, ‘अण्णा’ चित्रपटाचे पटकथाकार, अभिनेते शशांक उदपूरकर आणि निर्माते मनिंदर जैन यांची उपस्थिती होती.

तुम्ही मोठे झाल्यावर नोकरी करा वा बिझनेस, मात्र देशसेवेचा भाव नेहमी मनात ठेवा, असे या वेळी बोलताना अण्णा म्हणाले. कधीच खोटे बोलू नका, असा सल्लाही त्यांनी मुलांना दिला. आपल्या लहानपणीचा एक किस्सा त्यांनी ऐकवला. मुलांनी यशस्वी होण्यासाठी पाच बाबी ध्यानात ठेवाव्यात असे ते म्हणाले. चारित्र्य, आचरण, विचारांत शुद्धता, त्यागभावना, अपमान सहन करण्याची क्षमता विकसित करावी, असे अण्णा म्हणाले. समारंभात विजेत्या मुलांचे पालकही होते.

या राज्यातील आहेत विजेते
४० विजेत्यांपैकी सर्वाधिक १५ मुले राजस्थानची आहेत. हरियाणाचे ५, मध्य प्रदेश-झारखंडचे प्रत्येकी चार, छत्तीसगडचे तीन, बिहार, चंदिगड, गुजरात व पंजाबमधून प्रत्येकी दोन आणि दिल्लीचा एक स्पर्धक यात आहे.

अशी झाली स्पर्धा
ज्युनियर एडिटर स्पर्धेत मुलांना खास वृत्तपत्र काढायचे असते. स्पर्धेत ४ श्रेणी होत्या. पहिल्या श्रेणीत पहिली ते तिसरीपर्यंतचे विद्यार्थी होते. दुसऱ्या श्रेणीत ४ ते ६ वीपर्यंतचे विद्यार्थी. तिसऱ्या श्रेणीत ७ ते ९ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते. चौथ्या श्रेणीत १० वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी होते. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इलाइट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. वॅन इफ्रा वर्ल्ड यंग रीडर पुरस्कारानेही याला गौरवले.
बातम्या आणखी आहेत...