आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भटकळला बेड्या; साथीदार ‘हुड्डी’सह बिहारमध्ये जेरबंद, आज दिल्लीत आणणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली/पाटणा - पुण्यातील जर्मनी बेकरीसह देशभरात 40 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून सुमारे 600 जणांचे हत्याकांड करणारा इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासीन भटकळच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ‘तोयबा’चा अतिरेकी अब्दुल करीम टुंडाच्या अटकेनंतर 12 दिवसांतच बुधवारी रात्री ही कारवाई झाली. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. पंधरवड्यातच दुसर्‍या अतिरेक्याला झालेली अटक धोरणात्मक विजय असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. टुंडाला याच महिन्यात 17 रोजी अटक झाली होती.


इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेची स्थापना करणार्‍या यासीन भटकळवर सरकारने 35 लाख रुपये इनाम ठेवले होते. बिहारमधील चंपारण जिल्हय़ात त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत असदुल्ला अख्तर ऊर्फ ‘हड्डी’ही पकडला गेला आहे. बिहार पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांच्या परस्पर सहकार्याने ही अटक होऊ शकली. मोतिहारी कोर्टाने दोघांना तीन दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर एनआयएकडे सोपवले आहे. त्याला शुक्रवारी दिल्लीत आणण्यात येणार आहे.


30 वर्षीय मोहंमद जरार अहमद सिद्दीबाप्पा ऊर्फ यासीन भटकळ पाच वर्षांपासून नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये दडून बसला होता. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या मागावर होत्या. अटक झाली त्या वेळी भटकळ बांगलादेशात पळून जाण्याच्या बेतात होता. दिल्ली पोलिस आणि एनआयएने माहिती देणार्‍यास प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस ठेवले होते.


दोषी असल्यास शिक्षा द्या : यासीन भटकळचे वडील
मुलाने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळावी. अटकेमुळे आम्हाला दिलासा मिळाला. एन्काउंटरमध्ये मारला गेल्याचे आम्ही समजत होतो. तो कधीही पुण्याला गेला नव्हता. नोव्हेंबर 2005 मध्ये दुबईला गेला. दोन वर्षांनंतर तेथून गायब झाला होता.


राज्यात 8 गुन्ह्यांत वाँटेड
मुंबई । यासीन भटकळ महाराष्ट्रातील आठ गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. त्याच्या चौकशीसाठी एटीएसचे पथक दिल्लीला रवाना होत असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. मुंबई-पुणे येथील स्फोटांमध्ये वाँटेड यासीनवर राज्यात वेगवेगळे आठ गुन्हे नोंद आहेत.


दोन वेळा गुंगारा
यासीन सक्रिय अतिरेकी होता. स्वत: बॉम्ब तयार करत होता. त्याने दोनदा पोलिसांना गुंगारा दिला होता, असे माजी गृह सचिव आर.के. सिंह यांनी सांगितले. कोलकात्यात चोरीप्रकरणी अटक झालेला यासीन हाच भटकळ असल्याचे सिद्ध करता आले नव्हते. त्यामुळे सुटला होता.


17 धमाक्यांचे ‘टार्गेट’
भटकळ दिवाळीपूर्वी देशात 17 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणार होता. टुंडाच्या अटकेनंतर त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या घातपाताच्या तयारीसाठी तो नेपाळमध्ये राहून पाकिस्तानच्या संपर्कात होता. 12 राज्यांचे पोलिस मागावर यासीनचा शोध 12 राज्यांतील पोलिस घेत होते. बॉम्ब बनवण्यात वाकबगार असलेला यासीन एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीतही होता. मुंबई पोलिसांनी त्याच्यावर 15 लाख रुपयांचे ईनाम ठेवले होते.


मोहीम सुरूच राहणार : प्रत्येक अतिरेक्याला पकडेपर्यंत सरकार ही मोहीम सुरूच ठेवील. चुकीच्या व्यक्तीला अटक होणार नाही असा प्रयत्न राहील. त्यामुळे वेळ लागेल, असे गृह राज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी म्हटले आहे.


बीड, औरंगाबादेत मुक्कामाला होता
एनआयएचे पथक यासीनच्या अटकेनंतर बीडमध्ये दाखल झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यासीन बीड, औरंगाबाद, नांदेड आणि उदगीरमध्ये वास्तव्यास होता. या काळात त्याने बीडमधील 16 तरुणांची टीम तयार केली होती. त्यातील बहुतेक जण आजही पोलिसांच्या रेकॉर्डवर बेपत्ता आहेत. जबीशी संपर्क साधून त्याने मराठवाड्यात ‘तोयबा’चे जाळे पसरवले. वेरूळ स्फोटकसाठा प्रकरणात यासीन, जबीचे नाव पहिल्यांदा समोर आले.