नवी दिल्ली - टीव्हीवरील
बिग बॉससारख्या कार्यक्रमांतील अश्लीलतेचा मुद्दा मंगळवारी राज्यसभेत गाजला. या कार्यक्रमांतील कंटेंट अत्यंत वाईट असल्याने अनेक सदस्यांनी म्हटले. हे थांबवण्यासाठी काय पावले उचलली किंवा उचलली जात आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली.
सपाचे विशंभर प्रसाद निषाद म्हणाले, बिग बॉससारख्या कार्यक्रमांतील कंटेंट अत्यंत वाईट असतो. तरीही त्याचे प्रसारण होते.
सरकारकडे काही देखरेख यंत्रणा आहे काय? यावर बंदी घातली पाहिजे. रिपाइंचे रामदास आठवले यांनी निषाद यांना पाठिंबा दिला. काँग्रेसचे कर्णसिंह यांनीही लहान मुलींच्या नृत्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली. माझा नृत्याला विरोध नाही, परंतु लहान मुलींना या कार्यक्रमात सहभागी होण्यासंबंधी काही दिशानिर्देश असावेत, असे ते म्हणाले. या मुद्द्यांवर माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी निवेदन केले. खासगी वाहिन्यांवरील कार्यक्रम अश्लिलतेच्या व्याख्येच्या जवळ जात असल्याची कबुली राठोड यांनी दिली. त्यावर करडी नजर ठेवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. नियम मोडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची ग्वाही राठोड यांनी दिली. मंत्री राठोड म्हणाले की, टीव्ही कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी सरकारने टलेक्ट्राॅनिक मीडिया देखरेग केंद्र काढले आहे. ते २४ तास काम करते. सध्या ३०० वाहिन्यांवर लक्ष ठेवले जात आहे. त्याची क्षमता लवकरच ६०० ची करण्यात येईल.