आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Storm On Live RSS Chief Mohan Speech Broadcaste By Doordarshan, Divya Marathi

‘आरएसएस लाइव्ह’मुळे विजयादशमीला शिमगा, सरसंघचालकांच्या भाषणाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी केलेले भाषण दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह सर्वच विरोधकांनी मोदी सरकारवर टिकेची झोड उठवत हा सत्तेचा दुरुपयोग आहे, अशी टीका केली आहे. सत्ताधारी भाजपने मात्र दूरदर्शनच्या कृतीचे समर्थन केले आहे.

सरसंघचालकांच्या भाषणाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी या भाषणानंतर ट्विट केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. यानंतर काँग्रेस नेत्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘दूरदर्शन हे संघाचे मुखपत्र नाही. ते जनतेच्या पैशांवर चालते,’ अशी टीका काँग्रेसचे नेते राशीद अल्वी यांनी केली. हा प्रकार राष्ट्रीय आशाआकांक्षेच्या विपरीत आहे. संघाच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करणे आम्हाला कदापिही मान्य नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी नोंदवली. थेट प्रक्षेपणाचा निषेध करताना माकपने म्हटले की, हिंदुत्ववादी विचारसरणी रुजवण्यासाठी संघाने या घटनेचा वापर केला. संघासारख्या संघटनांच्या प्रमुखाच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्याची गरज नव्हती.

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदर्शनच्या निर्णयाचे समर्थन केले. दूरदर्शनने कुठलीही चूक केली नाही, असे ते म्हणाले. या घटनेमुळे मला आनंदच झाला आहे. राष्ट्र उभारणी करणारी संघ ही एकमेव संघटना आहे याची लोकांना जाणीव झाली आहे, असे भाजप नेत्या शायना एनसी यांनी म्हटले आहे.
* सत्तेच्या दुरुपयोगाचा विरोधकांचा आरोप सीमोल्लंघन

* इतिहासतज्ज्ञ गुहा यांनी फोडले वादाला तोंड
ज्येष्ठ इतिहास व अर्थतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी ट्विट करून या वादाला तोंड फोडले. भागवत यांचे भाषण दूरदर्शनवरुन दाखवणे हा सत्तेचा गंभीर दुरुपयोग आहे. संघ ही हिंदुत्ववादी सांप्रदायिक संघटना आहे. आता यानंतर मशिदीतील इमाम आणि चर्चमधील पाद्रीही दूरदर्शनकडे आपल्या भाषणांचे थेट प्रसारण करण्याची मागणी करू शकतात. या प्रकरणी कोणी ना कोणी जनहित याचिका दाखल करेल, अशी मला आशा आहे, असे, गुहा यांनी म्हटले आहे.

* ८९ वर्षांतील पहिलाच प्रकार
१९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी आरएसएसची स्थापना झाली. तेव्हापासून संघ नागपुरातील रेशीमबागेत विजयादशमी उत्सव साजरा करतो. त्यात सरसंघचालक स्वयंसेवकांसमोर भाषण करतात. संघाच्या ८९ वर्षांच्या इतिहासात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच वर्षी हे भाषण दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित करण्यात आले.

* सरकारी दूरदर्शनचा ‘स्वायत्त’अतिउत्साह
थेट प्रक्षेपणासाठी अतिउत्साही दूरदर्शनने दिल्लीहून तांत्रिक विशेषज्ञांची तीन पथके आणि ओबी व्हॅन नागपुरात पाठवली. सरकारी मालकीचे स्वायत्त दूरदर्शनवर फक्त केंद्र -राज्य सरकार किंवा संस्थेच्या प्रमुखाच्या भाषणच्या थेट प्रक्षेपणाची परंपरा आहे. तिला पहिल्यांदाच फाटा देऊन वादग्रस्त आरएसएसला सरकारी माध्यम उपलब्ध करून दिले आणि परंपरेचे सीमोल्लंघन केले.

* ही घातक परंपरा
आरएसएस ही वादग्रस्त हिंदू संघटना आहे. ती काही तटस्थ संघटना नाही. सरसंघचालकांच्या तासाभराच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण ही घातक परंपरा आहे. हा मोदी सरकारचा राजकीय निर्णय आहे.
संदीप दीक्षित, काँग्रेस प्रवक्ते.

* लोकशाही मूल्ये पायदळी
दूरदर्शनला संघाचे मुखपत्र म्हणून वापरण्याची परवानगी देऊन सरकारने धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली. डी. राजा, भाकप नेते

* हिंदुत्व हीच राष्ट्रीय ओळख
हिंदुत्व हीच देशाची खरी राष्ट्रीय ओळख आहे. हिंदुत्व विविधतेत एकता जपते, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या भाषणात म्हटले आहे.

* रिमोट कंट्रोलची खरी चाल
हा प्रकार आश्चर्यकारक, धक्कादायक, अविश्वसनीय आणि अभूतपूर्व आहे. सरकारी यंत्रणेचा असा दुरुपयोग करणे अत्यंत दुर्दैवी आहे. ही रिमोट कंट्रोलची खरी चाल, चरित्र आणि परिभाषा आहे.
अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेस नेते

... हा तर न्यूज इव्हेंट
हा आमच्यासाठी न्यूज इव्हेंट होता. इतर कार्यक्रमांप्रमाणेच या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यात आली. अर्चना दत्ता, महासंचालक (न्यूज), दूरदर्शन