छायाचित्र: बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचे स्वागत करताना कांचन गडकरी व नितीन गडकरी.
नवी दिल्ली - आम्हाला अभिनव भारत घडवायचा आहे. यात महिलांचे सक्षम बचत गट, कौशल्य विकास, स्वयंरोजगाराच्या संधी, स्वच्छ व सुंदर गावे व ग्रामीण क्षेत्रातील लोकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील प्रगतीच्या वाटा असतील... संवेदनशील नेते नितीन गडकरी यांनी काही मिनिटांत अभिनव भारताची ही कल्पना मांडली. त्या दिशेने पाऊल पडले असल्याचेही सांगितले. त्यांचे हे भाष्य जगप्रसिद्ध
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. या दांपत्याने गडकरींना असलेली सामाजिक विकासाची तळमळ प्रेरणादायी असल्याचे सांगून भारतात ग्रामविकासासाठी मदतीची ग्वाही दिली.
शुक्रवारी सकाळी ९.२० ची वेळ. तीनमूर्ती लेनवर प्रचंड सुरक्षा व्यवस्था. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांचे आगमन झाले. गडकरी व त्यांच्या पत्नी कांचन यांनी या दांपत्याचे स्वागत केले. गडकरी आणि गेट्स दोघेही ५८ वर्षांचे. बिल गेट्स म्हणाले, गडकरींबाबत मी ऐकून होतो. त्यांनी देशातील समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची जी कल्पना मांडली ती मला खूपच भावली. आरोग्यासाठी ती निकड आहे. स्वच्छतेसाठी मात्र येथे सहयोग मिळत नाही असे मला का वाटून जाते, असा प्रश्न बिल गेट्स यांनी उपस्थित केला. गडकरींनी ही बाब मान्य करीत येत्या २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून देशपातळीवर या अभियानाची सुरुवात होणार असल्याचे सांगितले. गडकरींनीही गेट्स यांना महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाममंत्री असताना मुंबईत बांधलेला सी-लिंक, ५५ उड्डाण पूल, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे याची माहिती दिली.
विदर्भात तयार केलेली बांबूची ब्रीफकेस त्यांनी सप्रेम भेट दिली. मेलिंडा यांना कांचन गडकरी यांनी कोसाची साडी दिली. या दोन्ही ज्या कुशल हातांनी तयार केल्या ते लोक आर्थिक हलाखीत आहेत. त्यांचे कौशल्य जगभर पोहोचावे याबाबत प्रयत्नशील असल्याचे गडकरींनी सांगितले. साडी स्वीकारताना मेलिंडा क्षणभर आनंदाने मोहरल्या! ब्युटीफुल! असे म्हणत त्यांनी कांचन गडकरींना धन्यवाद दिले. गेट्स यांच्यासोबत झालेली ही भेट फलदायी ठरल्याचे गडकरींनी सांगितले.
मक्याचे वडे, पोहे आणि मिसळ
कांचन गडकरी यांनी केलेले मक्याचे वडे आणि पोहे-मिसळ गेट्स दांपत्यास गडकरी यांनी आग्रहाने खाऊ घातली. गेट्स दांपत्यालाही ही चव खूप आवडली. विदर्भात २५० वाघ असल्याचे सांगून अगदी पाच फुटांवरून ते पाहता येतात, असे सांगून गडकरींनी दोघांनाही नागपूरला येण्याचे आमंत्रण दिले. ५० मिनिटांची ही दीर्घ चर्चा बिल गेट्स यांच्या ठोस मदतीच्या आश्वासनांनी पूर्ण झाली.