आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 घटक पक्षांसह 350 जागांची गोळाबेरीज, स्वबळावर सत्ता येण्याचा भाजपला विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात कॉँग्रेसने अजय रॉय या तुलनेत दुय्यम उमेदवाराला उभे केल्याची भावना भाजपची झाली आहे. मोदी वाराणसी आणि वडोदरा या दोन्ही ठिकाणी मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास भाजपने व्यक्त केला. आजघडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) एकूण 28 पक्षांचा समावेश झाला असून भाजपसह या घटक पक्षांना मिळणार्‍या जागांचा एकत्रित आकडा 350 च्या पुढे सहज जाईल, अशी गोळाबेरीज भाजपने केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी त्यांच्या एनडीएमध्ये 28 पक्षांचा समावेश असल्याचा दावा पक्षांच्या नावासह केला. या घटक पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होण्याची शक्यता असल्याने पाठिंबा देऊ शकणार्‍या सदस्यांची संख्या ही 350 भरत असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपला सरकार स्थापण्यासाठी एनडीए व्यतिरिक्त कोण्या इतर पक्षाची मदत घ्यावी लागणार नाही. स्वबळावर आमचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपने बांधली 28 प्रादेशिक पक्षांची मोट
आजघडीला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमान पक्ष, रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष, महाराष्ट्र गोमंतक पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तर अन्य राज्यांत अकाली दल (पंजाब), तेलुगू देसम पार्टी (आंध्र प्रदेश), लोक जनशक्ती पार्टी (बिहार), रिविलूशनली सोशलिस्ट पार्टी (केरळ), राष्ट्रीय लोकसमता पार्टी, एम.डी. एम.के (तामिळनाडू), पी.एम.के., डी. एम.डी.के, के.एम.डी.के, आय.जे.के, ऑल इंडिया एन. आर. कॉँग्रेस, जन सेवा पार्टी, केरळा कॉँग्रेस, हरियाणा जनहित कॉँग्रेस, अपना दल, नॅशनल पीपल्स पार्टी (मेघालय), नागा पीपल्स फ्रंट (नागालॅँड), युनाटटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (मिझोरम), गोरखा जनमुक्ती मोर्चा, न्यू जस्टीस पार्टी, नॉर्थ-ईस्ट रिजनल पोलिटिकल फ्रंट, नॅशनल पीपल्स पार्टी हे पक्ष एनडीएचा भाग आहेत.