आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलंद शहर सामूहिक बलात्कार प्रकरणावरून भाजप आक्रमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ लखनऊ - बुलंद शहर सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन सोमवारी भाजप खासदारांनी लोकसभेत उत्तर प्रदेशच्या अखिलेश सरकारवर निशाणा साधला. संतप्त खासदारांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. समाजवादी पक्षाच्या खासदारांनीही त्यास प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बुलंदशहर मतदारसंघाचे भाजप खासदार भोला सिंग यांनी शून्य प्रहरात सामूहिक बलात्काराचा मुद्दा उपस्थित केला. उत्तर प्रदेशात असे गुन्हे घडत असताना गुन्हेगार मात्र सरकारचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील स्थिती गंभीर असून पोलिस गुन्हेगारीवर आळा घालण्यास सक्षम नाहीत. भोला सिंग निवेदन करत असताना त्यांना अन्य पक्षांच्या खासदारांचाही पाठिंबा मिळाला. उत्तर प्रदेश जळत आहे,अशी प्रतिक्रिया त्यातील एकाने दिली. यूपीतील सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोर्चा उघडत पंतप्रधानांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा,अशी मागणी केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी बुलंदशहरसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार व पोलिसांना कडक पावले उचलण्यास सांगितले. राज्य सरकार आणि पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडावे. राज्यात अशा घटना घडू नयेत यावर भर द्यावा,असे नाईक यांनी एका कार्यक्रमानंतर सांगितले. ही पहिली घटना नाही. अशा प्रकारच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.मात्र,त्याचबरोबर राज्यपालांनी सरकारने उचललेल्या पावलांबद्दलही समाधान व्यक्त केले.

तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. नरेश(२५), बबलू(२२), रईस(२८) या आरोपींना रविवारी अटक करण्यात आली होती. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली असून चौकशीसाठी अनेकांना ताब्यता घेतले आहे. या गुन्ह्यामागे महामार्गावरील दरोडेखोरांची टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपींकडून साडे पाच हजार रुपये रोकड व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या खटल्याची जलदगती न्यायालयात सुनावणी होण्यासाठी विनंती केली जाईल,असे पोलिस महानिरीक्षक हरेराम शर्मा यांनी सांगितले. गुन्ह्यात सहभागी आणखी सात ते आठ जणांची नावे समाेर आली असून त्यांना पकडण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

महिला, मुलीवर झाला अत्याचार
नोएडाहून शाहजानपूरला कारने जाणाऱ्या एका कुटुंबाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९१ वर गुंडांनी अडवले. कारमधील पुरुषांना बांधून ठेवून त्यांनी त्यातील एक महिला व तिच्या १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला.

दिल्लीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पूर्व दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. पुरावा मिटवण्यासाठी तिचा मृतदेहही जाळण्यात आला. गेल्या गुरुवारी झालेली ही घटना सोमवारी उघड झाली आहे. आरोपींना पकडण्यात आले असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. दाेन्ही अाराेपी पीडितेचेे चुलतभाऊ अाहेत.
बातम्या आणखी आहेत...