आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Alerady Decided Prime Ministership Candidate

भाजपकडून पंतप्रधानपदावरील उमेदवाराबाबत सर्वांचे एकमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे असेल हेसुद्धा स्पष्ट झालेले आहे, परंतु पक्षाने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा न केल्यामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

निवडणुकीपूर्वी कोणताही मोठा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत. भाजपच्या बहुतांश नेतेमंडळींना ही बाब मान्य आहे. निवडणुकीनंतर प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये भाजपची स्थिती बळकट असल्यास, तर इतर पक्ष स्वत:हून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्यासाठी येतील, यासंदर्भातही भाजप नेत्यांमध्ये सर्वमान्यता असल्याचे दिसून येते. पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या विधानावरून ही बाब स्पष्ट होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दिल्लीच्या तालकटोरा मैदानात आयोजित महिला कार्यकर्ता संमेलनात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी लोकसभेसाठीच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व कोण करेल हे स्पष्ट आहे, परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शंका असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. भाजप आणखी मजबूत बनवण्याची गरज असून देशातील जनताही भाजपकडे आशेने बघत असल्याचे जेटली म्हणाले होते. या निवडणुकीत भाजपची स्थिती अधिक बळकट झाल्याचे चित्र उमटून आले, तर इतर पक्ष केवळ हातात हात देणार नाहीत तर गळ्यात गळा घालून सोबत येतील, असे जेटली म्हणाले होते. परंतु या वेळी जेटली यांनी नरेंद्र मोदी किंवा अन्य कोणाचाही उल्लेख केला नाही.

काही नेत्यांचा विरोध : भाजपच्या इतर नेत्यांनाही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत कोणतीही शंका नसल्याचे अनौपचारिकरीत्या सांगितले. मात्र, याबाबत पक्षनेतृत्वाकडून अद्याप कोणतीच घोषणा न झाल्याने त्यांच्यात संभ्रम आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित करण्यासाठी संसदीय मंडळाच्या काही वरिष्ठ नेत्यांची मते अनुकूल नाहीत.

घोषणेसाठी उत्सुकता : भारतीय जनता पक्ष 2014 ची लोकसभा निवडणूक निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्चात आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली लढवत असल्याचे जाहीर करण्याबाबत पक्षातील अनेक नेतेमंडळीत उत्सुकता आहे. पक्षातील बहुतांश नेत्यांना निवडणुकीनंतरच्या समीकरणासाठी ही सुरक्षित योजना वाटत आहे.


नेमकी अडचण काय?
0 मोदी यांच्याकडे पक्षाने निवडणूक प्रचाराची कमान सोपवून 2014 च्या निवडणुकीत भाजपचा चेहरा मोदी हेच असतील याचे स्पष्ट संकेत दिले. अशात मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले, तर निवडणूक प्रचाराची कमान इतर कोणाकडे सोपवावी लागेल.

0 मोदींचे नाव जाहीर होताच अडवाणींच्या गोटातून विरोधाची दाट शक्यता आहे. निवडणूक प्रचार प्रमुखपदाची घोषणा होताच याची झलक दिसली होती.

0 मोदींचे नाव जाहीर होऊनही त्यावर एकमत झाले नाही आणि मित्रपक्षांनी पंतप्रधानपदासाठी दुसर्‍या नावावर संमती दर्शवली तर पक्षासाठी अडचणीचे ठरेल.

0भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले. निवडणुकीनंतर भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्ता स्थापन करू शकला नाही, तर मोदी गुजरातमधील मुख्यमंत्रिपद सोडून लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारतील का, हा प्रश्न उपस्थित होतो.