आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Alleges Controversy Behind Maligning Image Of Narendra Modi

मोदींना जगभर बदनाम करण्याचे षड्यंत्र, भाजपचा कॉंग्रेसवर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध राष्ट्रपती बराक ओबामा यांना खासदारांनी लिहिलेल्या पत्राच्या सत्यतेचा वाद पेटू लागला आहे. काही खासदारांनी आपण या पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे हे नवे वादळ उठले आहे. मोदींना जगभर बदनाम करण्यासाठी काँग्रेसच्या ‘गलिच्छ मोहीम विभागा’चे हे षड्यंत्र असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये, अशी विनंती करणारे कथित पत्र लोकसभेच्या 40 आणि राज्यसभेच्या 25 खासदारांनी ओबामांना लिहिले होते. मात्र, या पत्रावरील खासदारांच्या सह्या बनावट असल्याचे आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. झारखंडचे भाजप खासदार सुदर्शन भगत यांचीही या पत्रावर स्वाक्षरी आहे. त्यांनी आपली स्वाक्षरी बनावट असल्याचे म्हटले असून लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. भगत हे झारखंडच्या लोहरदगाचे खासदार आहेत. खासदारांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून पत्र लिहिणे हे विशेषाधिकाराचे उल्लंघन असून दोषींना शिक्षा झाली पाहिजे. मीरा कुमार यांनी चौकशी केली नाही तर आपण न्यायालयात जाऊ, असे भगत यांनी म्हटले आहे. डीएमकेचे खासदार रामलिंगम यांनीही आपली स्वाक्षरी बनावट असल्याचे म्हटले आहे.

आपण नेहमीच तामिळमध्ये स्वाक्षरी करतो. मात्र, या पत्रावर इंग्रजीत स्वाक्षरी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी ‘दिव्य मराठी नेटवर्क’ने केलेल्या उलटतपासणीत माकप खासदार सीताराम येचुरी यांच्यासह 14 खासदारांनी आपण स्वाक्षरी केल्याचे स्पष्ट शब्दांत नाकारले होते. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी हे काँग्रेसचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. नरेंद्र मोदींना जगभर बदनाम करण्यासाठी काँग्रेसने हे षड्यंत्र रचल्याचे जावडेकर म्हणाले.

व्हिसा कोणाला द्यायचा ते अमेरिकेलाच माहीत : या वादातून काँग्रेसने अंग काढून घेतले आहे. व्हिसा कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही, हे अमेरिकेलाच माहीत, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.

मोदी भारत, आणि भाजपचेही ओझे


वॉशिंग्टन - ‘इमानटेट’ या भारतीय अमेरिकी समूहाने नरेंद्र मोदींवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदींवर गुजरात दंगलीचा डाग आहे. ते भारत, हिंदुत्व आणि एवढेच नव्हे तर भाजपसाठीही ओझे आहेत, असे या समूहाचे सहसंस्थापक शेख उबैद यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांना पत्र लिहिण्याची भारतीय खासदारांची कृती योग्यच असल्याचे या समूहाने म्हटले आहे.


अमेरिकी वृत्तपत्रांत चर्चा

खासदारांनी ओबामांना लिहिलेल्या पत्राची चर्चा अमेरिकेतील वृत्तपत्रांतूनही सुरू आहे. भारतीय खासदारांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना लिहिलेले पत्र अकल्पनीय असल्याचे ‘द वॉश्ािंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. एखाद्या देशाच्या अंतर्गत प्रकरणात अमेरिकेच्या अध्यक्षांना लक्ष घालण्याची मागणी करणे हे अद्भुत असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.खासदारांचे पत्र बनावटच

एका खासदाराच्या लेटरहेडवर टाइप केलेल्या या पत्रावर अशोकचक्रही आहे. ‘भारतीय खासदारांची नावे आणि स्वाक्षर्‍या’ असे या पत्राच्या शेवटी लिहिले आहे. भारताच्या खासदाराच्या लेटरहेडवर लिहिलेल्या पत्रावर भारताखेरीज अन्य कोणत्या देशाच्या खासदारांच्या स्वाक्षर्‍या असू शकतात? यावरूनच हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट होते.
- सीताराम येचुरी, माकप खासदार


बनावट असेल तर तुरुंगात जाईल

माकप नेते सीताराम येचुरी व भाकपचे नेते अच्युतन या दोघांनी सही केली होती. ओबामांना लिहिलेल्या पत्रावरील प्रत्येक स्वाक्षरी खरी आहे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. माझा दावा खोटा निघाल्यास मी खासदारकीचा राजीनामा देईन.तुरुंगात जाण्याचीही माझी तयारी आहे.
- मोहंमद अदीब, अपक्ष खासदार