आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप पुन्हा एक झटका देण्याच्या तयारीत, संसद समित्यांमध्येही काँग्रेसला ठेंगा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी आटापिटा करूनही भाजपने दाद न दिल्याने निराश झालेल्या काँग्रेसला पुन्हा एक झटका देण्याच्या तयारीत भाजप असून स्थायी समितीच्या माध्यमातून तो लवकरच उघड होणार आहे.

केंद्रात यूपीए सरकार असताना काँग्रेससह अन्य सहयोगी पक्षांची संसदेतील स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदावर रेलचेल होती. आता मोदी सरकारमध्ये उट्टे काढण्याची संधी भाजपला चालून आलेली आहे. संसदेत १६ स्थायी समित्या या लोकसभेच्या तर ८ राज्यसभेच्या आहेत. लोकसभेत कॉँग्रेसचे संख्याबळ घटल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही. याच तुलनेत लोकसभेतील स्थायी समित्यांसाठी अध्यक्षपदाची निवड होईल तेव्हा कॉँग्रेसच्या वाट्याला केवळ एक समिती येणार आहे. परंतु कॉँग्रेसच्या सूत्राने "दिव्य मराठी'ला दिलेल्या माहितीनुसार पुन्हा दोन समित्यांचे अध्यक्षपद मिळावे यासाठी कॉँग्रेस प्रयत्न करणार आहे. लोकसभेत भाजपचे संख्याबळ २८२ आहे. यानुसार आकडेमोड केल्यास त्यांच्या वाट्याला ८ ते ९ समित्यांचे अध्यक्षपद येणार आहे. तर उर्वरित समित्यांचे अध्यक्षपद हे अण्णाद्रमुक, तृणमूल कॉँग्रेस, शिवसेना, बिजू जनता दल, लोजपा, समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी कॉँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदाप्रमाणेच समित्यांच्या अध्यक्षपदांची कॉँग्रेसची मागणी धुडकावून लावायची, असा निश्चय भाजपने केला असल्याचे कळते. काँग्रेसला एखादी समिती वाढवून दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर हुकणार आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसचे के. व्ही. थॉमस यांच्याकडे देण्यात आले आहे. विरोधी पक्षाकडे ही समिती असावी ही पद्धती रूढ करण्यात आली आहे. निवास समितीचे अध्यक्षपद भाजपचे किरीट सोमय्या यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्यसभेत ३ अध्यक्षपदे : राज्यसभेत मात्र कॉँग्रेसला आठपैकी तीन समित्या मिळू शकतात. या सभागृहात काँग्रेसचे वर्चस्व असून ६८ सदस्य आहेत. पर्यावरण, गृह आणि विधी व न्याय या समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसकडे येणार आहे.