आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा ५ राज्यांत खांदेपालट, कर्नाटकची सूत्रे येदियुरप्पांकडे, मौर्य यांच्याकडे UP

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केशव प्रसाद मौर्य - Divya Marathi
केशव प्रसाद मौर्य
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील प्रदेश अध्यक्ष बदलल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशातील सूत्रे राज्यातील प्रमुख आेबीसी चेहरा आणि फुलपूरचे खासदार केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री विजय सांपला यांच्याकडे पंजाबचे नेतृत्व सोपवले आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा हे आता कर्नाटकचे नवे भाजपाध्यक्ष असतील.
अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी खासदार तापिर गाआे तेलंगणचे नेतृत्व डॉ. के. लक्ष्मण यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यांत नवीन खांदेपालट करताना अनुभवी नेत्यांच्या हाती सूत्रे दिली आहेत. जेणेकरून भाजप संघटनात्मक पातळीवर आणखी मजबूत होऊ शकेल. बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, मणिपूर, चंदिगड आणि दिल्लीतही नवीन अध्यक्षांची नियुक्ती लवकरच जाहीर होणार असल्याचे अरुण सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
उत्तरप्रदेशात मौर्य यांच्यासाठी आव्हान, ४५ % आेबीसी : भाजपलाउत्तर प्रदेशात यादवेतर आेबीसी चेहऱ्याचा शोध होता. तो माैर्य यांच्यापुढे येऊन थांबला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून राजकारणात आलेल्या मौर्य मातीशी नाळ असलेले नेते आहेत. तरुण आणि ऊर्जावान अशी त्यांची आेळख. ते शेतकरी कुटुंबातील आहेत. चहा विकून आणि मजुरी करून त्यांनी उदरनिर्वाह केला आहे. मौर्य यांनी आपल्या क्षमतेच्या बळावर पक्षात मोठे पद संपादन केले. त्यांनी फुलपूरमध्ये पहिल्यांदा कमळ फुलवले. वास्तविक हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता राज्यातील ४५ टक्के आेबीसी मतांना पक्षाकडे वळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मौर्य यांनी विहिंप, बजरंग दल, गोरक्षा यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. राम जन्मभूमी आंदोलनात ते सक्रिय होते.

कर्नाटकमध्ये पुन्हा दाखवला विश्वास
कर्नाटकमध्येभाजपने लिंगायत समुदायाचे मोठे नेते येदियुरप्पा यांना अध्यक्षपद देऊन जुन्या नेत्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. येदियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले होते. त्यांनी २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आपला पक्ष स्थापन केला होता. त्याचा येदियुरप्पांना फारसा फायदा झाला नव्हता. म्हणून त्यांनी २०१४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी ते शिमोगामधून खासदार म्हणून निवडून आले होेते. कर्नाटकमध्ये मे २०१८ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. येदियुरप्पा यांच्या विरोधातील बहुतांश आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत. काही प्रकरणे बाकी आहेत. त्यामध्येही ते निर्दोष ठरतील, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.