आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरांचा राजीनामा नाहीच; काँग्रेस आग्रही मात्र भाजपने मागणी फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ललित मोदी प्रकरणात भाजपने राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर ‘कृपादृष्टी ’कायम ठेवली आहे. काँग्रेसने ललित मोदी वादात वसुंधरा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असताना भाजपने मात्र ती फेटाळून लावली. त्यामुळे राजे यांच्या पाठिशी पक्ष उभा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ललित मोदी यांना मदत केल्याच्या प्रकरणात राजे यांचे नाव पुढे आल्यापासून काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले होते. वसुंधरा यांची हकालपट्टी केली नाही तर आगामी पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा काँग्रेसने दिला होता. त्यामुळे दबाव वाढलेल्या भाजपने सुधांशू त्रिवेदी यांना शुक्रवारी पत्रकार परिषद घ्यायला लावून दोन्ही महिला नेत्यांची पाठराखण केली. दोन्ही नेत्यांच्या विरोधातील आरोपाला तांत्रिक आणि वैध असा कोणताही आधार नसल्याने कारवाईचा प्रश्न नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या अगोदर आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांच्या स्थलांतरसंबंधीच्या याचिकेवरील ब्रिटनमधील सुनावणीत वसुंधरा यांनी साक्ष दिली होती. वसुंधरा यांनी ही साक्ष गुपचूपपणे दिली होती. ही बाब उघड झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. या अगोदर भाजपने स्वराज यांच्या वादावर काहीही प्रतिक्रिया न देता मौन धारण करून त्यांचे समर्थन केले होते. परंतु त्यावर काँग्रेसने आक्रमकतेची धार आणखी वाढवली. सरकारला स्वत:चा ‘बचाव’ करायचा असल्यास त्यांनी दोन महिला नेत्यांकडून त्यांच्या पदाचे राजीनामे घ्यावेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

डॅमेज कन्ट्रोलसाठी मोदी, अमित शहा यांच्यात चर्चा
ललित मोदी प्रकरणाचा धुरळा उडाल्याने पक्षाची प्रतिमा डागाळू नये म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत गेलेल्या शहा यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

मोदींना भारतात आणण्याचे प्रयत्न करावेत
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना सरकारने भारतात आणण्याचे प्रयत्न करावेत. त्यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना मायदेशी का आणले जात नाही ? त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली का जात नाही ? ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाकडे दाद का मागत नाही ? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

पंजाब दौरा रद्द
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला नियोजित पंजाब दौरा रद्द केला आहे. त्या शहा यांची भेट घेऊन या प्रकरणी प्रत्यक्ष चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.