आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Backs Sushma Swaraj, Lalit Modi Refuses To Comment On Travel Document Row

ललित मोदींना लंडनमध्ये मदत, परराष्ट्रमंत्री स्वराज अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी धारेवर धरले आहे. मात्र, या मुद्द्यावर भाजपने स्वराज यांची भूमिका योग्य असल्याचे सांगून जोरदार पाठराखण केली. ब्रिटनमधून पोर्तुगालला जाण्यासाठी प्रवासी व्हिसा देण्याच्या कामी मोदींना मदत केल्याचा स्वराज यांच्यावर आरोप आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी स्वराज यांच्यावर असलेले आरोप अत्यंत गंभीर असून नैतिक दृष्टिकोनातून स्वराज यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. दाऊदने मानवतेच्या आधारे मदत मागितली तर सरकार मदत करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे समाजवादी पक्षाने मात्र स्वराज यांची बाजू घेत निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. ललित मोदी यांना मदत घटनाबाह्य आहे. मोदी सरकारने यावर खुलासा केलाच पाहिजे, असे माकप नेत्या वृंदा करात यांनी म्हटले आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे म्हणाले, ‘पंतप्रधान आता गप्प का? त्यांच्याच इशाऱ्यावर हे सर्व चालू आहे असे वाटते.’

अमित शहांची काँग्रेसवर आगपाखड : स्वराज यांनी मानवतेच्या दृष्टीने ललित मोदी यांना मदत केली होती. या प्रकरणात सरकार स्वराज यांच्या पाठीशी आहे. एखाद्या भारतीयाने परदेशात मदत मागितली म्हणून लंडनमधील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मदत पुरवण्यात आली. भोपाळ वायू दुर्घटनेतील युनियन कार्बाइडचे अधिकारी वॉरेन अँडरसन व बोफोर्स प्रकरणात उद्योगपती आेट्टाव्हियो क्वात्रोची या दोघांनाही देशाबाहेर सुरक्षित घालवण्यात काँग्रेसचाच हात होता, असेही शहा यांनी म्हटले आहे.

ललित मोदींच्या लीगल टीममध्ये स्वराज यांची मुलगी :
माध्यमांनुसार, स्वराज यांनी मुलगी बांसुरी ललित मोदींच्या लीगल टीममध्ये सहभागी होती. बांसुरी ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवीधारक असून सध्या दिल्ली हायकोर्ट व सर्वोच्च न्यायालयात वकिली करते.

टी-२०मधील गैरव्यवहाराचे आरोप : टी-२० क्रिकेट स्पर्धेतील निधीत कथित प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या ललित मोदींवर भारतात लुक-आऊट नोटीस काढण्यात आली आहे. २०११ मध्ये सरकारने त्यांचा पासपोर्टही रद्द केला. मात्र, ऑगस्ट २०१४ मध्ये दिल्ली हायकोर्टाने तो पुन्हा बहाल केला होता. यादरम्यान, यूपीए सरकारने एक परिपत्रक काढून ललित मोदींना कोणतीही मदत करू नये. अन्यथा दोन्ही देशांतील संबंध बिघडतील, असा इशारा दिला होता.

प्रकरण काय?
एका वृत्तवाहिनीनुसार, सुषमा स्वराज यांनी २०१३ मध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी असताना ललित मोदींना मदत केली होती. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना ललित मोदींच्या मदतीने आपला पुतण्या ज्योतिर्मय कौशल यास ब्रिटनमध्ये प्रवेश मिळवून द्यावयाचा होता. तेव्हा सुषमा स्वराज यांनी मोदींशी संपर्क साधला होता. नंतर २०१४ मध्ये स्वराज मंत्री झाल्यानंतर मोदींना ब्रिटनमधून पाेर्तुगालला जाण्यासाठी मदत केली.

यात गैर काय : स्वराज
या प्रकरणी टीकेचे लक्ष्य झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी रविवारी दोन वेळा टि्वट करून याबाबत खुलासा केला. ‘ललित मोदींना मी काय लाभ मिळवून दिला? त्यांना अशी कोणती मदत केली? त्यांच्या कॅन्सर पीडित पत्नीवर उपचार व शस्त्रक्रियेसाठी त्यांना पोर्तुगालला जावयाचे होते. त्यासाठी काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करता याव्यात, एवढीच सुविधा दिली. ते त्या वेळी लंडनमध्येच होते. शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा लंडनमध्ये आले. यात गैर काय केले?’