आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादी गटांना मदतीच्या प्रस्तावासाठी खासदार ओवेसींवर कारवाई करा : भाजप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हैदराबादेत इसिसच्या संशयित मॉड्यूलमधील सदस्यांना कायदेशीर मदत देण्याची घोषणा करणारे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे देशद्रोही आहेत, असा आरोप भाजपने केला असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ओवेसी हे दहशतवाद्यांना ऑक्सिजन पुरवत आहेत, ते दहशतवाद्यांच्या बाजूने उभे आहेत असे दिसत आहे, असा आरोप करून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्वास नक्वी म्हणाले की, भारतावर हल्ला करण्याची धमकी देणारा व्हिडिओ इसिसने जारी केला आहे आणि ओवेसी हे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे इसिसला मदत करत आहेत. हा देशद्रोह आहे. राजकारणात एवढ्या खालच्या पातळीला जाणे योग्य नाही. दहशतवाद्यांना कायदेशीर मदत देण्याची भाषा करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे लोक दहशतवादाला ऑक्सिजनच पुरवत आहेत. राजकारण करावे, पण तुम्ही दहशतवादाला पाठिंबा देत आहात, असे दिसणाऱ्या कारवाया मात्र करू नये.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता श्रीकांत शर्मा म्हणाले की, ओवेसी हे एकीकडे इसिसवर टीका करतात आणि दुसरीकडे मात्र अशा दहशतवादी कारवायांत सहभागी असणाऱ्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे तपास करणाऱ्या संस्थांनी कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर कारवाई करावी. दहशतवादाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्यांचा निषेधच करायला हवा.

भाजपचे प्रवक्ता नलीन कोहली म्हणाले की, एखाद्या प्रकरणात उडी घेण्याआधी ओवेसींनी त्याचा सर्व बाजूंनी विचार करायला हवा. हैदराबादमध्ये अटक करण्यात आलेले युवक रमजानच्या काळात दहशतवादी कारवाया करण्याचा कट आखत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. आता उद्या हे पुरावे पुरेसे आहेत असा निकाल न्यायालयाने दिला तर या युवकांना शिक्षा होऊ शकते. त्या वेळी तुम्ही दहशतवाद्यांना खुला पाठिंबा देण्याची तुमची इच्छा होती का, या प्रश्नाचे उत्तर ओवेसी यांना द्यावे लागेल.

ओवेसींविरुद्ध याचिका
मेरठ| एनआयएने अटक केलेल्या पाच युवकांना आपल्य पक्षातर्फे कायदेशीर मदत दिली जाईल, हे ओवेसी यांचे वक्तव्य म्हणजे देशद्रोह आहे. त्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल करावा,अशी मागणी करणारी याचिका उत्तर प्रदेश बार कौन्सिलचे सदस्य अनिलकुमार बक्षी यांनी शनिवारी दाखल केली. बक्षी यांनीच रविवारी ही माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...