आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भाजपप्रणित 'एनडीए'मधून जदयूने बाहेर पडण्याचे संकेत दिल्यानंतर भाजपने नितिशकुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागितला आहे. नितीशकुमार यांना जर एनडीएतून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी सर्वप्रथम भाजपचा पाठिंबा नाकारावा व राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व बिहारमधील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. ठाकूर यांनी केली आहे.
भाजपने लोकसभेच्या निवडणूकांसाठी गुजराजचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड केल्यानंतर भाजप आणि जदयूने यांच्यात शीतयुद्ध सुरु झाले आहे. नितीशकुमार यांचा मोदींना उघड विरोध असून, त्यांच्या पक्षाचे नेते मोदींविरुद्ध गरळ ओखत आहेत. तसेच मोदींच्या नेतृत्वात काम करणार नसल्याचे जदयूने म्हटले आहे.
दरम्यान, भाजपने जदयूला चांगलेच सुनावले आङे. भाजपप्रणित एनडीएत राहायचे की नाही याचा निर्णय संबंधित पक्षाचा असून, त्यांचा त्यांनी त्याबाबत ठरवावे. मात्र भाजपचा पाठिंबा घेऊन बिहारमध्ये गेली अनेक वर्षे सरकार चालवणा-या नितीशकुमार यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा. दरम्यान, लालकृष्ण अडवानी नाराजीनाम्यातून बाहेर आले असून, त्यांनी जदयूचे अध्यक्ष शरद यादव व नितीशकुमार यांच्याशी फोनवर चर्चा केली.
बिहारमध्ये 243 विधानसभेत नितीशकुमार यांच्या जदयूचे सर्वात जास्त 118 आमदार आहेत. तर भाजपचेही 91 आमदार आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा जदयू- भाजप या मित्रपक्षांनी 2010 साली विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडवला होता. लालूंच्या पक्षाचे बिहारमध्ये फक्त 23 आमदार आहेत. याचबरोबर अपक्ष व इतर छोट्या पक्षाचे 11 आमदार आहेत.
नितीशकुमार यांनी भाजपबरोबरची युती तोडण्याचा निर्णय घेतला असून, 243 विधानसभेच्या सभागृहात बहुमतासाठी 122 सदस्यसंख्येची जुळवाजुळव केल्याचे सांगण्यात येते. नितीशकुमार यांनी तीन अपक्षांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे. याचबरोर काही आमदार अप्रत्यक्षपणे नितीशकुमार यांना मदत करणार असल्याचे कळते. त्यामुळे नितीशकुमारांनी त्यांना कमी पडत असलेल्या चार जागांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे भाजपने 91 आमदारांचा पाठिंबा काढला तरी नितीशकुमार यांच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भाजपने पाठिंबा काढण्याची धमकी न देता पाठिंबा नाकारावा किंवा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.