आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नियंत्रण’ कक्षेबाहेर औरंगाबाद शहर बससेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या शहर बस वाहतूक शाखेने मुख्य मार्गावरील वर्दळीच्या आठ ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन केले. प्रत्येक कक्षासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्यात आली. प्रवाशांना बसेसचे वेळापत्रक सांगणे, अतिरिक्त बस उपलब्ध करून देणे, बसेसच्या नोंदी ठेवणे, खासगी वाहतुकीला आळा घालणे, प्रवाशांसाठी पास सवलत योजनेचा लाभ मिळवून देणे हा कक्ष स्थापनेमागचा उद्देश होता. मात्र, या उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. डीबी स्टारने पाहणी केल्यानंतर मयूरनगर, टीव्ही सेंटर, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाबा पेट्रोल पंप, सिडको बसस्थानक, शहागंज आणि औरंगपुरा येथील नियंत्रण कक्ष कुलूपबंद असल्याचे दिसून आले.


शहर बस जिल्ह्याबाहेर
नियमानुसार शहर बस 30 किमीच्या आतच चालवता येते, पण एसटीने शहरातील बसेसच्या फे-या कमी करून बीड, जालना आणि सिल्लोड आदी बाहेरगावांसाठी पाठवल्या आहेत. 50 बसपैकी 14 बाहेर गावी जात आहेत; पण लग्नसराईमुळे केवळ 6 बसच बाहेरगावी जात असल्याचे विभाग नियंत्रकांचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही दरवाजे उघडे असलेल्या या शहर बसेस बीड, जालना आणि सिल्लोड येथे नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत. शिवाय शहरवासीयांना बसेस कमी पडत आहेत. आरटीओ नियमानुसार असे करता येत नाही, हा नियम मोडल्यास महाराष्ट्र मोटार व्हेइकल अ‍ॅक्ट 1988 च्या कलम 166 आणि 192 अन्वये शहर बस जप्त करण्याचे अधिकार आरटीओला आहेत.


कनेक्ट सेवा गुलदस्त्यात
जानेवारी 2013 मध्ये मुंबईसाठी पहाटे सुटणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या वेळेनुसार दोन मार्गांवरून शहर बसेस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन होते. हर्सूल ते सिडको बसस्थानक, क्रांती चौक मार्गे रेल्वेस्टेशन आणि हर्सूल ते दिल्ली गेट, मिल कॉर्नर, औरंगपुरा, उस्मानपुरा मार्गे रेल्वेस्टेशन असा या बसेसचा मार्ग होता. मात्र, जनशताब्दी एक्स्प्रेसला कनेक्ट असलेली ही सेवा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही.


डीबी स्टारने शहरातील आठ नियंत्रण कक्षांची पाहणी केली असता खरी परिस्थिती समोर आली
मध्यवर्ती बसस्थानक
पार्किंगच्या बाजूलाच शहर बस थांबा आहे. येथे प्रवाशांना बस फे-यांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेले ध्वनिक्षेपक बंद झाले आहेत. प्रवासी निवा-यात असलेले वाहतूक नियंत्रण कक्ष नियंत्रकाअभावी बंद आहेत. त्यामुळे शहर बससेवा पूर्णपणे कोलमडली आहे.
सिडको बसस्थानक
नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवासी निवा-यातील वाहतूक नियंत्रण कक्षाला कुलूप लावण्यात आले आहे. सध्या येथे बांधकाम साहित्य पडलेले आहे; परंतु फेब्रुवारी 2013 मध्ये दिलीप वाळंूजकर सेवानिवृत्त झाल्याने वाहतूक नियंत्रकपदाचा कार्यभार वाहक पी. आर. कुळकर्णी यांच्यावर सोपवण्यात आल्याचे तपासात उघड झाले, पण त्याचाही फायदा झाला नाही. कारण या नियंत्रण कक्षातील विद्यार्थी पास सेवाही बंद करण्यात आली आहे.
मयूरनगर
येथील शहर बस थांबा 19 वर्षे जुना आहे. महापालिकेची एएमटी बससेवा असताना या थांब्यालगतच वाहतूक नियंत्रण कक्ष आणि विद्यार्थी पास सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले. सध्या या कक्षाचे हजेरी कार्यालयात रूपांतर झाले आहे. पालिकेचे स्वच्छता कर्मचारी येथे दररोज येऊन हजेरी लावतात.
टीव्ही सेंटर
येथे खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या बस थांब्यालगतचे वाहतूक नियंत्रण कक्ष कुलूपबंद आहे. 2008 मध्ये सुरू करण्यात आलेली औरंगाबाद-पुणे बससेवा नियंत्रकाअभावी दीड महिन्यातच बंद करण्यात आली. पास सुविधेसाठी नागरिकांना सिडको बसस्थानकात जावे लागते.
बाबा पेट्रोलपंप
येथे असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. छत नसलेल्या कक्षात सध्या घाणीचे साम्राज्य आहे. नागरिक या कक्षाचा स्वच्छतागृह म्हणून सर्रास वापर करत आहेत. येथे बस थांब्याची गरज असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
औरंगपुरा
येथील वाहतूक नियंत्रण कक्ष एका हातगाडीवर चालते, हे विशेष. मात्र, आता येथून वाहतूक नियंत्रकही गायब झाल्याने हा चालता-फिरता कक्ष बंद पडला आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेले पास सेवा केंद्रही बंद पडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
रेल्वेस्थानक
वर्षभरापूर्वीच रेल्वेस्थानक. परिसरात बांधण्यात आलेले वाहतूक नियंत्रण कक्ष दोन महिन्यांपासून कुलूपबंद आहे. प्रवाशांना माहिती देणारे ध्वनिक्षेपकही बंद पडलेले आहे. येथील वाहतूक नियंत्रक सतीश इंगळे यांची ड्यूटी सिडको बसस्थानकात लावण्यात आली आहे.
शहागंज
डीबी स्टारने शहागंज बसस्थानकाच्या समस्या वेळोवेळी मांडल्या. त्यानंतर येथे प्रवासी निवारा, पाणपोई, स्वच्छतागृह आणि वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. मात्र, वर्षभरापासून येथे वाहतूक नियंत्रक नसल्याने नियंत्रण कक्ष बंद आहे. येथील विद्यार्थी पास सेवा केंद्रही बंद पडले आहे.


काय म्हणतात विद्यार्थी
व्हॅकेशन क्लासेस सुरू आहेत, पण वाळूज बससेवा नियमित नाही. पास सुविधा केंद्र बंद असल्याने ही सेवाही मिळत नाही. मोहित गंगवाल, वाळूज


गेल्या महिन्यात मी पास काढला होता. नवीन पाससाठी बोनाफाइड सर्टिफिकेट आणण्यास सांगितले. आता पास सेवा केंद्र बंद झाले आहे. विलास राऊत


वाळूजसाठी शहर बसेसच्या फार कमी फे-या आहेत. महामंडळही याकडे दुर्लक्ष करत आहे. बस थांबत नाही. दुसरे म्हणजे पास सेवाही उपलब्ध नसते.
किरण आदमाने


थेट सवाल
संजय सुपेकर
विभाग नियंत्रक

शहर बसेस बीड, जालना, सिल्लोडसाठी धावतात..
लग्नसराईचे दिवस असल्याने प्रवाशांची सोय व्हावी यासाठी ही सेवा सुरू केली आहे.
यामुळे कायद्याचा अवमान होत आहे...
शहर बस बाहेरगावी चालवण्याबाबत कोणताच नियम नाही. त्यामुळे कायद्याच अवमान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


थेट सवाल
डी. टी. पाथरकर
आगारप्रमुख

० शहरातील वाहतूक नियंत्रण कक्ष बंद आहेत...
वाहतूक नियंत्रकच नाहीत. वाहकांना पदोन्नती मिळाल्यानंतरच वाहतूक नियंत्रक मिळतात. चालक आणि यांत्रिकी विभागाची पद भरती झाली आहे. मात्र, वाहकांची भरती झालेली नाही. ती झाल्यानंतरच नियंत्रकांचा प्रश्न निकाली निघेल.
० विद्यार्थी पास सेवाही बंद आहे...
शाळा, महाविद्यालये उघडल्यावर 15 जूननंतर ही सेवा सुरू केली जाईल. महाविद्यालयांनी जागा उपलब्ध करून दिली तर शहरातील प्रत्येक महाविद्यालयात ही सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू.
० शहर बससेवा जिल्ह्याबाहेरही सुरू आहे...
सध्या सहा बसेस जिल्ह्याबाहेर सुरू आहेत. हवे तर आजपासूनच त्याही बंद करतो.
० यासाठी आरटीओची परवानगी घेतली होती का?
यासाठी आरटीओची परवानगी घ्यायची गरज नाही.


तत्काळ गाड्या जप्त करणार
शासनाने 1991 च्या परिपत्रकान्वये शहर बसेसला बाहेरगावी प्रवास करण्याची परवानगी नाकारली आहे. एसटी महामंडळाच्या या मनमानी कारभाराविरुद्ध आम्ही कारवाई करून तत्काळ सर्व शहर बसेस जप्त करणार आहोत.
अनिलकुमार बस्ते, सहायक परिवहन आयुक्त


काय म्हणतात नागरिक
ध्वनिक्षेपक नाहीत, वाहतूक नियंत्रक नाही. बस थांब्यावर कधीच थांबत नाही. बसला फलकही नसतात. दोन-दोन तास बस येत नाही. वेळेचे कोणतेच नियोजन नाही.
मधुकर वनशेटे, नागरिक, शिवनेरी कॉलनी


बस थांब्यावर मार्ग सांगायला कुणीही नसते. बसेस उशिरा येत असल्याने रिक्षांचे फावते. महिलांचीही गैरसोय होते.
विठ्ठल नागे, नागरिक, प्रतापगडनगर


शहर बससेवा सुरळीत चालवता येत नसेल तर एसटीने ती बंद करावी. महापालिकेची सेवा चांगली होती. एसटीचे कोणतेच वेळापत्रक नसते.
व्ही. डी. वाघमारे, नागरिक