आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP For Short Time Keep Aside Resignation; Advani Mum

भाजपमधील राजीनामानाट्यावर तूर्त पडदा; ‘नमो’वर अडवाणींचे ‘मम’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजीनामा दिल्यानंतर 30 तासांच्या आत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी अखेर राजी झाले. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सायंकाळी 7 वाजता ही घोषणा केली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अडवाणी यांना फोन केला. भाजप संसदीय मंडळाचा निर्णय टाळू नका, हा त्यांचा सल्ला अडवाणी यांनी मानला. आता सर्व आलबेल आहे, असे राजनाथ म्हणाले.


राजनाथ यांनी अडवाणी यांच्या घरीच ही घोषणा केली. या वेळी खुद्द अडवाणी मात्र हजर नव्हते. विचारले तर म्हणाले, मीच त्यांना येऊ नका म्हणालो. भावी पीएम अडवाणींच्या मर्जीने ठरेल, या संघाच्या फॉर्म्युल्यावर ते राजी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


माघार घेण्यासारखे घडले तरी काय?
तोच भाजप, तेच नेते आणि तेच निर्णय. काहीही बदलले नाही. अडवाणींच्या नाराजीची पर्वा पक्षाला नव्हती. सगळे आपापल्या कामात गर्क होते. मोदी गांधीनगरात मेळावा घेत राहिले. राजनाथ बांसवाडा येथे निघून गेले. जेटली परदेशवारीच्या तयारीला लागले. मोदींबाबतचा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे राजनाथ यांनी सकाळीच स्पष्ट केले. पर्याय संपले होते. अडवाणींचा संशय सरसंघचालकांनी दूर केला. फोन करून म्हणाले की, तुमच्या आक्षेपांची आम्ही काळजी घेतो. 2014 साठीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार आता तुमच्या मर्जीनेच ठरवला जाईल.


म्हणजे संकट दूर?
तूर्त तरी. कारण पीएमपदाची वेळ आल्यावर अडवाणी पुन्हा पुढे येतील. सध्या मनोमन तयार झाले नाहीत. त्यामुळे गैरहजर राहिले.


पुढे काय करतील?
सर्वात मोठी चाल फेल ठरल्यावर अडवाणी सध्या चिंतनाच्या पवित्र्यात राहतील. भाजप त्यांना पक्षाऐवजी एनडीएवर काम करण्याचे सांगेन.


मूव्हर्स त्रिकूट
० राजनाथ, जेटली यांना हवे तसेच झाले. मोदी : अनेकांच्या दबावानंतरही प्रचारप्रमुख पदावर कायम. पक्षात पत वाढली.
लूझर्स जोडी
० जसवंत, उमा भारती यांनी अडवाणींशी सलगी दाखवली. भेटीसाठी गेले. कठोर वक्तव्ये केली. यातून नेतृत्वाचे वैर घेतले.
आणि नो टेकर्स
० अडवाणी आता संघाचे, ना पक्षाचे राहिले. सुषमा स्वराज, गडकरी दोन्ही गटांपासून दूर राहिले. आता दोघांपासूनही दूर गेले आहेत.


पंतप्रधानपदाचा उमेदवार अडवाणी स्वत: ठरवणार याचा अर्थ काय?
हे आश्वासन नाही, दगा आहे. अडवाणीच जर ‘पीएम’ ठरवणार असतील तर ते स्वत:चे नाव निश्चित करू शकणार नाहीत. ज्या संघाच्या एका फोनवर अडवाणी राजी होतात तोच संघ ‘पीएम’पदात हस्तक्षेप करणार नाही कशावरून? असे वाटते की, अडवाणींच्याच आग्रहावरून सन्मानाने परतीचे हे नाटक रचले गेले. ते यशस्वीही झाले. या नाट्यामुळे जदयू नक्की भाजपच्या वळणावर येईल. कदाचित मोदींसाठी स्वत: शरद यादव मध्यस्थी करतील. कारण, त्यांच्याकडे आता मुद्दाच शिल्लक नाही.


तिकडे ‘मोदी मिशन’ सुरू
नरेंद्र मोदींनी राष्‍ट्रीय अभियान सुरू केले आहे. केवळ गुजरातचे नेतृत्व ही छबी बदलण्यासाठी त्यांनी सरदार पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी पाच लाख गावांतील शेतकºयांकडून लोखंड मागितले आहे. जेणेकरून गुजरातमध्ये जगातील सर्वांत मोठा पुतळा साकारता येईल. मोहीम पटेल जयंती अर्थात 31 ऑक्टोबरपासून सुरू होईल.