आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिवासी भारतीयांसाठी भाजपचे विशेष अभियान, दुहेरी नागरिकत्त्वाचे आश्‍वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिवासी भारतीयांसाठी विशेष अभियान सुरू केले आहे. अमेरिका तसेच कॅनडातील ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी, एनडीए ओव्हरसीज विंग,बे-एरिया समाज (सॅन फ्रॅन्सिस्को) अशा अनेक संघटनाअनिवासी भारतीयांना पक्षात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
भाजप ओव्हरसीज विंगच्या अमेरिकेतील वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, फ्लोरिडा, जॉर्जिया, कॅलिफोर्निया, आदी शाखा सक्रिय आहेत. भाजपचे सदस्य नोंदणी अभियान येथे जोरात सुरू आहे. सदस्यत्व शुल्क विद्यार्थ्यांसाठी 1 डॉलर तर प्रौढ सक्रिय सदस्यांसाठी 100 डॉलर आहे. केंद्रात भाजपप्रणीत एनडीएचे सरकार आल्यास अनिवासी भारतीयांच्या दुहेरी नागरिकत्वासह इतर विविध मागण्या पूर्ण केल्या जाणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. अनिवासी भारतीय, विशेषत: कॅनडातील भारतीयांची दुहेरी नागरिकत्वाची मागणी फार वर्षांपासून प्रलंबित असल्याचे कॅनडा शाखेचे अध्यक्ष नरेंद्र भल्ला यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनिवासी भारतीयांना दिलेले आश्वासन या रूपात या मुद्द्याचा प्रचार केला जात आहे.

गडकरींकडून पुनरुच्चार
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नुकताच लंडन दौर्‍यात या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. वाजपेयींनी दिलेले हे आश्वासन पूर्ण केले जाईल, असे सांगत गडकरींनी या मागणीला पाठिंबा दर्शवला. भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी त्यांना भारतात येऊन आपले नाव असलेल्या मतदारसंघातच मतदान करावे लागते. मात्र, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हे शक्य नसल्याने, अनिवासी नागरिकांना राहत असलेल्या देशातील उच्चायुक्त कार्यालय, दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात मतदान करण्याची सुविधा मिळावी, अशी मागणी अनिवासी नागरिकांकडून केली जात आहे.

मोदींवर टीका व स्तुतिसुमनेही
अमेरिका व कॅनडात राहणार्‍या अनिवासी भारतीयांच्या एका गटाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एका वादग्रस्त विधानावर प्रसिद्धिपत्रक प्रकाशित करून टीका केली आहे. दुसरीकडे गुजरात समाज नामक संघटना अमेरिकेतील अटलांटा, डेट्रॉइट, कॅनसस, न्यूयॉर्कसह कॅनडातील व्हँकुव्हर, टोरंटो या शहरांत मोदींची प्रतिमा सुधारण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे.