आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला संयम राखण्याची सूचना, अन्यथा होऊ शकतो रक्तपात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे नेते तथा राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्थ विभागावर हल्लाबोल केला आहे. अर्थ विभागाबद्दल बोलताना संयम ठेवण्याची सूचना मला करण्यात आली आहे. मी तसे न वागल्यास बहुदा रक्तपात होईल, अशा शब्दांत स्वामींनी नामोल्लेख न करता जेटलींवर टीका केली. गुरुवारपासून शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे.

लोक मला शिस्तीत राहण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. मला त्याची जाणीव व्हायला हवी, अन्यथा रक्तपात घडून येईल, असे स्वामी यांनी शुक्रवारी ट्विट केले. स्वामी यांनी आपल्या शाब्दिक हल्ल्यात जेटलींचा उल्लेख टाळला. मुख्य अर्थ सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याविषयी वक्तव्य करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जेटली यांनी स्वामींना संयमाचा सल्ला दिला होता. स्वामी गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधिकच सक्रिय झाले आहेत. त्यांनी अर्थ विभागातील अधिकारी मंत्र्यांवर टीकास्त्र सोडण्याचे सत्र सुरू केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांची भाजपमधील वादग्रस्त नेते म्हणून आहे. स्वामींनी यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केले. कायदेशीर लढाई लढताना त्यांनी सोनिया गांधींपासून रॉबर्ट वढेरापर्यंत सर्वांवर टीका केली. काही प्रकरणात खटला दाखल केला होता. परंतु गेल्या काही दिवसांत स्वामींनी अर्थ विभागाच्या कारभारावर टीका करण्याचा सपाटा लावला.

कोट, टायमध्ये वेटर : स्वामींनी वृत्तपत्रातील एका छायाचित्रावरून शुक्रवारी पुन्हा जेटलींवर टीका केली. बीजिंगमध्ये बँक ऑफ चायनाच्या बैठकीत जेटलींनी हजेरी लावल्याचे छायाचित्र शुक्रवारच्या अंकात झळकले होते. त्यावर स्वामींनी तिरकस प्रतिक्रिया दिली. परदेशात वावरताना मंत्र्यांनी पारंपरिक किंवा आधुनिक भारतीय कपडे परिधान करून जायला हवे. काही मंत्री कोट व टायमध्ये वेटरसारखे दिसू लागतात, असा टोला त्यांनी लगावला.

पक्षाचे सध्या वेट अँड वॉच
स्वामी यांनी भाजप सरकारमधील मंत्री, अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने त्याचा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत अाहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर नाराजी व्यक्त केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. स्वामींच्या वक्तव्यावर पक्ष नेतृत्वाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असली तरी त्यांच्यावर एवढ्यात काही कारवाई केली जाणार नाही. काही दिवस पक्षाकडून ‘थांबा आणि पाहा’ चे धोरण अवलंबिले जाणार आहे. स्वामींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याची चर्चा होते. परंतु अशा बेताल वक्तव्याबद्दल संघ स्वामींच्या मुळीच पाठीशी राहणार नाही, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...