आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Announced Lok Sabh Candidature List , Lalkrishna Advani, Divya Marathi

अडवाणी गांधीनगरवर नाराज, हिना यांना नंदूरबारचे तिकीट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपने बुधवारी ६७ उमेदवारांच्या यादीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची गांधीनगरचे तिकीट दिले. परंतु भोपाळमधून लढण्याची इच्छा असल्याने अडवाणी यांनी तूर्त तरी त्यावर सहमत नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्‍ट्रात नंदुरबार येथे डॉ. हिना गावित, भिवंडीतून कपिल पाटील, निवडणूक लढवतील. अभिनेत्री हेमा मालिनी यांना मथुरेतून उमेदवारी देण्यात आली. नरेंद्र मोदी यांना वाराणसीखेरीज पुन्हा बडोद्यातून तिकीट देण्यात आले आहे.


अडवाणींची समजूत काढण्यासाठी सुषमा स्वराज व गडकरी त्यांच्या निवासस्थानी गेले. मात्र आपण यावर सहमत नसून भोपाळच्या तिकीट वाटपानंतरच निर्णय कळवू, असे अडवाणींनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपने निर्णय बदलण्यास नकार दिला आहे. गेल्या विधानसभेत भाजपचा गांधीनगरमध्ये पराभव झाला होता. मोदी दगाफटका करून आपला पराभव करतील असे अडवाणींना वाटते.


हिनांची माणिकरावांशी लढत
डॉ. हिना गावित यांनी बुधवारी दिल्लीत येऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्या नंदुरबारमधून निवडणूक लढवणार असून, कॉँग्रेसचे विद्यमान मंत्री माणिकराव गावित यांना आव्हान देणार आहेत. नरेंद्र मोदी यांचे विचार मला आवडतात, देशासाठी मलाही काही करायचे आहे. त्यामुळेच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे; मी विचारांनी स्वतंत्र आहे, असे हिना यांनी स्पष्ट केले.


डॉ. गावित यांचे मंत्रिपद काढले : हिना यांचे वडील व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली आहे. याबाबत अजित पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. राज्यपालांनीही त्याला रात्री मंजुरी दिली.


मोहन रावले राष्‍ट्रवादीत
शिवसेनेतून बाहेर पडलेले माजी खासदार मोहन रावले गुरुवारी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधवारी त्यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेत राष्‍ट्रवादीत प्रवेशाचे त्यांचे आमंत्रण स्वीकारले.