नवी दिल्ली- दिल्लीतील शाहदराचे भाजपचे विधायक जितेंद्र सिंह शंटी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात आमदार शंटी बालंबाल बचावले. तीन अज्ञान हल्लेखोरांनी आमदार शंटी यांच्यावर गोळीबार केला. बुधवारी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
या घटनेमुळे दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शंटी यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, आमदार शंटी यांच्या घरी तीन अज्ञात व्यक्ती आले. ते दरवाज्याची बेल वाजवत होते. आमदार शंटी बाहेर आले असता त्यांनी काही कागदपत्रे पुढे करून ते साक्षांकीत करण्याची विनंती केली. तिघांच्या डोक्यावर हेल्मेट होते. आमदार शंटी कागदपत्रे पाहात असतानाच त्यातील एकाजवळचे पिस्तूल शंटीं यांनी पाहिले. प्रसंगावधान राखून शंटी यांनी तिघाना धक्का देऊन घरात धावले. हल्लेखोरांनी शंटी यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. . सुदैवाने शंटी यांना बालंबाल बचावले.
ही संपूर्ण घटना शंटी यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिस पुढील चौकशी करत आहेत.