नवी दिल्ली - ललितगेट प्रकरणावरुन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर शुक्रवारीही लोकसभेत गदारोळ झाला आणि कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले. त्याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी घोटाळ्यात फसलेल्या काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसद परिसरात धरणे दिले. काँग्रेसने संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा करणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यानंतर भाजपने काँग्रेसशासित राज्यातील हरीश रावत आणि वीरभद्रसिंह या दोन मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
राज्यसभेचे कामकाज स्थगित
लोकसभेतील गोंधळानंतर राज्यसभेतही विरोधकांनी ललितगेटवरुन गदारोळ केला आणि कामकाज स्थगित करावे लागले. राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानतंर जेडीयू खासदार शरद यादव म्हणाले, 'भाजप खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्यापुढे धरणे देत आहेत. सरकार सांगेल का, की ते कोणाकडे मागणी करत आहेत.'