नवी दिल्ली - स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी भाजपचे गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी लोकसभेत अशासकीय विधेयकाचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे, अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने विदर्भ राज्याबाबत आलेले प्रस्ताव विचाराधीन नसल्याचा खुलासा लोकसभेत केला होता.
छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणारी भारतीय जनता पार्टी मात्र, विदर्भाबाबत कोणतीही पावले उचलत नसल्यामुळे नेते यांनी अशासकीय विधेयकाद्वारे स्वतंत्र विदर्भ निर्मितीसाठी आयोग स्थापण्याची मागणी केली. गेल्या ७५ वर्षापासून ही मागणी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाचा विकास होऊ दिला नाही. विदर्भाचा ४५
हजार कोटी रुपयांचा अनुशेष निर्माण झाला आहे. विदर्भाबाबत भाजपची सकारात्मक भूमिका आहे. परंतु त्याची सुरुवात होणे गरजेचे असल्याने
आपण अशासकीय विधेयक मांडले असल्याचे ते म्हणाले.