आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांतच भाजप चीत; पोटनिवडणुकीत जबर झटका, लव्ह जिहाद अंगलट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात चार महिन्यांपूर्वी आलेली मोदी लाट आता ओसरू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये विरोधकांचा पूर्णत: सफाया करणा-या भाजपला नऊ राज्यांतील ३३ विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीत स्वत:च्या ताब्यातील २४ पैकी १४ जागा गमवाव्या लागल्या. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने ८ तर राजस्थान आणि गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपकडून प्रत्येकी तीन जागा हिरावून घेतल्या. लव्ह जिहाद आणि प्रक्षोभक भाषणे भाजप नेत्यांच्या चांगलीच अंगलट आली.

नऊ राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या ३३ जागांसाठी १३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल जशास तसे राहिले. फक्त चेहरे बदलले. समाजवादी पार्टीने मैनपुरी (उत्तर प्रदेश), भाजपने वडोदरा (गुजरात), आणि टीआरएसने मेदक (तेलंगण) आपल्या ताब्यात ठेवले. मात्र विधानसभेच्या जागांबाबत भाजपचे गणित फिसकटले. नऊ राज्यांतील ३२ जागांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. त्यापैकी भाजपने १२, काँग्रेसने ७, सपाने ८ तर तृणमूल काँग्रेस, माकप, टीडीपी आणि एआययूडीएफने प्रत्येकी एक जागा जिंकली. सिक्कीममध्ये अपक्ष विजयी झाला. आसाम व पश्चिम बंगालमध्ये भाजपने प्रत्येकी एक जागा जिंकली. छत्तीसगडमधील एका जागेचा निकाल २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.

१०० दिवसांच्या आतच लोकांनी मोदीमुक्त भारतासाठी मतदान दिले आहे. अमित शहा यांनी आता नवीन नोकरी शोधायला हवी, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतरचा तिसरा पराभव : लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा हा सलग तिसरा पराभव आहे. याआधी उत्तराखंडमध्ये तीन जागांवर भाजप पराभूत झाला होता. त्यानंतर राज्यांतील विधानसभेच्या १८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी आठ जागांवर विजय मिळवला तर सात जागा गमवाव्या लागल्या होत्या.

अच्छे दिन, अच्छी बात : ‘अच्छे दिन, अच्छी बात... अच्छे परिणाम’ अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या ‘अच्छे दिन’च्या प्रचारावर खोचक प्रतिक्रिया दिली.

लोकसभा पोटनिवडणुकीत केवळ चेहरे बदलले, विजयांचा फरकही घटला : १. मैनपुरी (उत्तर प्रदेश): समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यांच्या जागेवर नातू तेज प्रताप यांनी ३ लाख२१ हजार मते मिळवून भाजपचे प्रेमसिंह शाक्य पराभव केला. २. वडोदरा (गुजरात): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागेवर भाजपच्या रंजनबेन भट्ट यांनी ३ लाख ३० हजार मते मिळवून काँग्रेसचे नरेंद्र रावत यांचा पराभव केला. मोदींना ५ लाख ७० हजार मते मिळाली होती. ३. मेदक (तेलंगण): मुख्यमंत्री आणि टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांच्या जागेवर त्यांच्याच पक्षाचे के.के. प्रभाकर रेड्डी यांनी ३ लाख ६१ हजार मते मिळवून काँग्रेसच्या व्ही. सुनीता लक्ष्मीरेड्डी यांचा पराभव केला. राव यांना ३ लाख ९७ हजार मते मिळाली होती.

विधानसभा राज्यनिहाय जागा
राज्य एकूण भाजप काँग्रेस अन्य
यूपी (११) ३ (-८) ०० ८ (सप)
गुजरात (९) ६ (-३) ३ (+३) ००
राजस्थान (४) १ (-३) ३ (+३) ००
आसाम (३) १ (+१) १ (-१) १
प. बंगाल (२) १(+१) ०० १ (तृ.)
आंध्र प्रदेश (१) ०० ०० १ (टीडीपी)
त्रिपुरा (१) ०० ०० १ (माकप)
सिक्कीम (१) ०० ०० १ (अपक्ष)

राजस्थानमध्ये
१. तिकीटवाटपात मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे काहीच चालले नाही. अमित शहा यांनी त्यांच्या इच्छेने उमेदवार निवडले. त्याचा फटका भाजपला बसला.
२. मागील निवडणुकीत दणक्यात विजय मिळाल्याने भाजप नेते अतिआत्मविश्वासात गेले. सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकजुटीने लढली.

उत्तर प्रदेशात
१. योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी लव्ह जिहादचा मुद्दा लावून धरला. प्रक्षोभक भाषणे दिली. त्यामुळे अल्पसंख्याकांची मते भाजपच्या विरोधात एकवटली.
२. बसपाने उमेदवार उभे केले नाहीत. काँग्रेसनेही रस दाखवला नाही. सपाशी थेट लढत झाली. भाजपविरोधी मतांचे विभाजन टळले.
३. लोकसभा निवडणुकीत दलित मतदारांनी मोदींना साथ दलिी होती. पण या वेळी बसपा मैदानात नसल्यामुळे त्यांनी सपाला मते दिली.

गुजरातमध्ये
१. मोदी आणि अमित शहा हे दोन बडे नेते केंद्रात गेल्याने भाजप कमकुवत झाला.
२. नव्या मुख्यमंत्री आनंदीबेन यांच्यावर मतदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वास बसलेला नाही.

महाराष्ट्र-हरियाणात परिणाम
महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होणाऱ्या निवडणुकीत दलित, अल्पसंख्याक मतदारांना भाजपच्या विरोधात एकवटण्याचे प्रयत्न आणखी जोरकस होतील. लव्ह जिहाद व हिंदुत्वाचा संघ परिवाराचा मुद्दा विरोधकांचे मुख्य लक्ष्य राहील.

समाजवादी पार्टी, काँग्रेसचे मनोधैर्य वाढेल. जनतेने मोदी सरकारच्या विरोधात कौल दिला, मोदी लाट आता संपुष्टात आली आहे, असे वातावरण देशभरात निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. त्याचा परिणाम हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीवर दिसेल.

महाराष्ट्रात शिवसेना आता जागावाटपात आपल्या इच्छेप्रमाणे भाजपला मान झुकवण्यास भाग पाडेल. वाढीव जागांची मागणी भाजपला लावून धरणे अवघड जाईल. महाराष्ट्रात भाजप- शिवसेना महायुतीच्या घटक पक्षांना जागा मागताना बळ मिळेल.