आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेत प्रथमच भाजपचे अर्धशतक; भाजपचे ५३, काँग्रेसचे ५९ सदस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यसभेच्या २७ जागांसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ११ जागा जिंकल्या. यामुळे या वरिष्ठ सभागृहात भाजपच्या सदस्यसंख्येने प्रथमच पन्नाशी ओलांडली आहे. भाजपच्या ५३ जागा झाल्या असून काँग्रेस प्रथमच ६० संख्येच्या खाली आली आहे. काँग्रेसचे सभागृहात आता एकूण ५९ सदस्य असतील.

सात राज्यांत झालेल्या या निवडणुकीत हरियाणा वगळता कुठेही क्रॉस व्होटिंगचा प्रकार झाला नाही. हरियाणात दोन जागांसाठी निवडणूक होती. एका जागेवर भाजपचे बीरेंद्रसिंह यांचा विजय निश्चित होता, तर दुसऱ्या जागी भाजपने अपक्ष सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला होता. चंद्रा यांना विजयासाठी काँग्रेसच्या मतांची गरज होती. त्यांना काँग्रेस सदस्यांची मते मिळाली नाहीत तरी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने त्यांच्या १३ सदस्यांची मते रद्दबातल ठरली आणि चंद्रा राज्यसभेत पोहाेचले.

दरम्यान, उत्तर प्रदेशात कपिल सिब्बल यांच्या विरोधात भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली. मात्र, सिब्बल समाजवादी पक्ष व बसपच्या मदतीने राज्यसभेत दाखल झाले. राज्यसभेच्या या निवडणुकीत ५७ जागांपैकी ३० जागांवरील उमेदवार सर्वसंमतीने निवडले गेले, तर ७ राज्यांतील २७ जागांसाठी मतदान झाले. यात समाजवादी पक्षाने ७, काँग्रेसने ६ तर बसपने २ जागा जिंकल्या.

हरियाणात भूपेंद्रसिंह हुडा यांच्या गटातील १७ आमदार आनंद यांना पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर मतदान करणार नसल्याची चर्चा निवडणुकीच्या आधीपासूनच होती. झारखंडमध्ये झामुमोचे प्रमुख शिबू सोरेन यांचे चिरंजीव बसंत सोरेन यांना निवडून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. मतदानाच्या दिवशीच झामुमोच्या एका आमदारास अटक आणि दोन काँग्रेस आमदारांविरुद्ध अटक वाॅरंट जारी झाल्यामुळे हे तिघेही मतदान करू शकले नसल्यामुळे भाजपचे महेश पोद्दार विजयी झाले.
पुढे वाचा...

> भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग; सिब्बल विजयी
> काँग्रेसला हरियाणात माेठा फटका
बातम्या आणखी आहेत...