नवी दिल्ली/ मुंबई - राज्यातील भाजप सरकारमधील शिवसेनेच्या सहभागाबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम असली तरीही रविवारी होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या आणखी दोन मंत्र्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान कार्यालय आणि भाजप अध्यक्ष
अमित शहा यांनी शिवसेनेशी संपर्क साधून शुक्रवारपर्यंत दोन नावे सुचवण्यास सांगितले आहे. त्यामुळे उभय पक्षातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आधी विश्वास, मगच विस्तार’ असे सांगितल्यानंतर भाजपने शिवसेनेला केंद्रातील दोन मंत्रिपदांची ही ऑफर दिली आहे. या मंत्रिपदांच्या बदल्यात १२ नोव्हेंबर रोजी होणा-या फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ)शिवसेना गटनेते अनंत गिते यांच्याशी संपर्क साधून मंत्रिपदासाठी शुक्रवारपर्यंत दोन नावे सुचवण्यास सांगितले आहे. गिते यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चाही केली आहे. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नावे सूचवण्यास सांगितले.
फडणवीसांची शिष्टाई फळाला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार चालवण्यापेक्षा शिवसेनेला सोबत घेणेच कसे महत्वाचे आणि फायद्याचे आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना समजावून सांगितल्यामुळे दोघेही त्यासाठी तयार झाले आणि त्यातूनच शिवसेनेला केंद्रातील दोन वाढीव मंत्रिपदे देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. या मंत्रिपदांच्या बदल्यात शिवसेना राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडून देईल, असे भाजपला वाटते.
नगरचे गांधी,चंद्रपूरचे अहिर यांची वर्णी शक्य
रविवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात होत अहमदनगरचे दिलीप गांधी आणि चंद्रपूरचे हंसराज अहिर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवाय सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात घेऊन शिवसेनेशी खेळी करण्याचाही भाजपचा डाव आहे.
केंद्रात सध्या ४६ जणांचे छोटेखानी मंत्रिमंडळ आहे. प्रत्येक मंत्र्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. कोळसा घोटाळा बाहेर काढणारे अहिर यांचा सुरुवातीलाच मंत्रिमंडळात समावेश होणार होता. परंतु ऐनवेळी प्रकाश जावडेकरांचे नाव पुढे आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना विस्तारापर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता. विदर्भातील गडकरी वजनदार मंत्री आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही विदर्भाचेच आहेत. त्यामुळे अहिर यांचे नाव ऐनवेळी मागेही पडू शकते. गांधी यांच्यासाठी भाजपचे काही नेते प्रयत्नशील आहेत. राज्यातील नव्या मंत्र्याकडे ग्रामविकास मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. सध्या हे खाते गडकरी यांच्याकडे आहे. परंतु खात्याचा कारभार प्रचंड मोठा असल्याने ते अन्य राज्यातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याकडेही जाण्याची शक्यता आहे.
नेता शिवसेनेचा, निवड मात्र भाजपची!
भाजपने शिवसेनेला दोन केंद्रीय मंत्रिपदांची ऑफर दिली खरी, परंतु दोनपैकी एक नाव सुरेश प्रभू यांचेच सुचवा, असा आग्रह भाजप अध्यक्ष शाहांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला. त्यासाठी त्यांनी स्वत: मातोश्रीवर फोनही केला. यावरून शिवसेनेने कोणाला मंत्रिपद द्यायचे हेही भाजपच ठरवू लागला आहे, हे स्पष्ट होते. प्रभू हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने भाजपमध्ये आहेत. ते मंत्री झाले तरीही शिवसेनेचे मंत्री नसतील.
राज्यातील तिढा कायमच
राज्यातील सत्तावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे दोन्ही पक्ष सांगत आहेत. मात्र शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रिपद व २ : १ मंत्रिपदाच्या मागणीचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेने आधी विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा द्यावा, अशी भाजपची भूमिका तर ठरावाआधी काही मंत्री तरी घ्या, असा शिवसेनेचा आग्रह आहे.
काँग्रेस नेतेपदासाठी स्पर्धा
काँग्रेसच्या सर्व आमदारांनी गुरुवारी गटनेता निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षा
सोनिया गांधींना बहाल केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी माघार घेतल्यामुळे आता माजी मंत्री पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे आघाडीवर आहेत. लातूरचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या रूपाने एेनवेळी मराठवाड्यालाही संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांची यादीही तयार
राज्यात सत्तेत वाटा मिळाल्यास कोणाला मंत्री बनवायचे याची यादी शिवसेनेने तयार केली आहे. राज्यात ५ कॅबिनेट व ५ राज्यमंत्री मिळण्याची शक्यता शिवसेनेला वाटत आहे. दिवाकर रावते, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट तर वैभव नाईक, सुनील प्रभू, हिंगोलीचे डॉ. जयप्रकाश मुंदडा, लोह्याचे प्रताप पाटील चिखलीकर आणि खानापूरचे अनिल बाबर यांचा राज्यमंत्र्यांमध्ये समावेश असल्याचे समजते. उदय सामंत यांनाही लॉटरी लागण्याची शक्यता आहे.