आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप पुन्हा पराभूत होईल, गुजरातचा विकास व्यक्तिकेंद्रित - पी. चिदंबरम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे फूटपाडे नेते असून त्यांनी गुजरातच्या विकासाविषयी केलेले दावे अतिरंजित आहेत. हे दावे भाजपला कामी येणार नाहीत. त्यांचा फुगा आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये फूटणार असून भाजप पुन्हा पराभूत होईल, असा घणाघात अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.


येथे पत्रकारांशी संवाद साधताना सोमवारी त्यांनी भाजपवर प्रखर टीका केली. ते म्हणाले, प्रत्येक मॉडेलचे काही सकारात्मक तसेच काही नकारात्मक पैलू असतात. गुजरातच्या विकासाच्या दाव्याचे वास्तव असे की, सामूहिक विकासावर त्यांचा विश्वास नसावा. त्यांचा विकास हा व्यक्तिकेंद्रित आहे. त्यामुळेच या राज्यात अनेक लोक आजही मागास आहेत. त्यांच्या विकासासाठी मोदींनी प्रयत्न केले नाहीत.


मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय? या प्रश्नाचे थेट उत्तर देणे चिदंबरम यांनी टाळले. परंतु यावर भाष्य करताना ते म्हणाले, आम्ही असे समजतो की, मोदी हे एकजूट निर्माण करणारे नव्हे, तर समाजात फूट पाडणारे आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव जेव्हा पुढे आले तेव्हा त्यांच्याविरोधात पक्षात बंडखोरी झाली. एखाद्या पक्षात राष्‍ट्रीय पातळीवर इतक्या मोठ्या स्वरूपात बंडखोरी प्रथमच पाहावयास मिळाली आहे.


मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक
नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसचे आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत पाहावयास मिळत आहे. भाजपने त्यांना 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचार समितीचे प्रमुख पद सोपवल्यानंतर काँग्रेसने त्यांच्याविरोधात आक्रम होण्याचा निर्णय घेतला. चिदंबरम यांनीही मोदी, भाजपविरोधात प्रथमच जाहीरपणे भूमिका मांडल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.


भाजपचा रंग बदलला नाही
भाजपवर टीका करताना चिदंबरम म्हणाले, ‘भाजपचे रंगढंग बदलले नाहीत. हा पक्ष धर्मनिरपेक्षताविरोधी विचारांचे समर्थन करतो. भाजप पुन्हा एकदा समान नागरी कायदा, अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा तसेच काश्मिरातील कलम 370 रद्द करण्यारे विभाजनवादी मुद्दे हाती घेत आहे. पक्षाने हे मुद्दे या आधीही उपस्थित केले होते. त्या वेळी त्यांना जनतेने नाकारले. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपला लोक पुन्हा नाकारतील. हा पक्ष पराभूत होईल.’


पीएमपदाचा विचार करत नाही
चिदंमबरम यांना ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत काय ? असा थेट सवाल करण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘आपण हे याआधीही स्पष्ट केले आहे की, मी माझ्या मर्यादा जाणतो. त्या मर्यादांमध्ये राहूनच मी काम करतो. मी यात्रा करू शकतो. लिहू-वाचू शकतो. परंतु पंतप्रधान होण्याबाबत मी विचार करत नाही.’ डॉ. मनमोहनसिंग यांचे वारस म्हणून मध्यंतरी त्यांच्या नावाची चर्चा होती.