आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP RSS LJP Ram Vilas Paswan Udit Raj Latest News In Marathi

दलित नेते रामविलास पासवान एनडीएत येण्याआधीच बिहार भाजपमध्ये वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दलितांच्या नावावर राजकारण करणारे दोन बडे नेते भाजपच्या तंबूत जाण्याच्या तयारीत आहेत. यूपीतील दलितांचे नेते उदित राज आज भाजपमध्ये सहभागी होणार आहेत. याचबरोबर रामविलास पासवानही एनडीएत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बिहारमध्ये पासवान यांच्या लोक जनशक्तीला भाजप सात जागा देण्याचा विचार करीत आहे. दुसरीकडे, प्रदेश भाजपच्या कोर कमिटीने पासवान यांच्यासोबत आघाडी करण्यास विरोध केला आहे. बिहारमधील कोर कमिटीचा मी सदस्य असूनही मला या संभाव्य आघाडीबाबत माहिती कशी काय नाही असा सवाल वरिष्ठ नेते अश्विनीकुमार चौबे यांनी केला आहे. मी कोर कमिटीचा सदस्य आहे. कोर कमिटीने यापूर्वीच पासवान यांच्या पक्षाबरोबर आघाडी करू नये असे सूचित केले असतानाही हे कसे काय होऊ शकते. याबाबत माझे मत कोणीही जाणून घेतलेले नाही. पक्षाकडे याबाबतची मी नाराजी कळविली आहे असे चौबे यांनी सांगितले.
भाजपमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत असलेले उदित राज यांचे म्हणणे आहे की, आता दलितांबाबत विचार करणारा पक्ष म्हणून मला भाजपचा सर्वांत चांगला वाटत आहे. काँग्रेसचे सरकार केंद्रात दहा वर्षापासून आहे पण त्यांनी दलितांसाठी काहीही केले नाही. अटलजींच्या काळात दलितांसाठी चांगले काम झाले मात्र ते पुढे नेण्यात मनमोहन सरकार फेल झाले आहे.
दुसरीकडे, लोक जनशक्ती पार्टी (लोजपा)चे नेते रामविलास पासवान हे सुद्धा एनडीएत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सांगितले जात आहे की, मुलगा चिराग पासवान याने आपल्या वडीलांना हे समजावून सांगितले की, देशातील कोणताही सर्व्हे पाहा मोदीची लाट असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसची अवस्था तर नक्कीच वाईट होणार आहे. त्यापेक्षा आताच भाजपमध्ये गेल्यास फायदा होईल. मुलाच्या या तर्कानंतर पासवानही त्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहेत. रामविलास पासवान यांनी 1989 ते 2009 या काळात प्रत्येक सरकारमध्ये सामील राहिले आहेत किंवा मंत्रिपद भूषविले आहे. ते 8 वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत, आता ते राज्यसभेत आहेत. त्यांच्या पक्षाचा सध्या लोकसभेत एकही खासदार नाही.
लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस बिहारमध्ये आघाडी करणार आहे. यात सहभागी होऊन पासवान काही प्रमाणात राजकीय लाभ पदरात पाडून घेऊ इच्छित असले तरी या आघाडीच्या घोषणेला होत असलेल्या विलंबास कंटाळून आता त्यांनी भाजपला बळ देण्याचे ठरवले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक पक्ष म्हणून पासवान यांनी यापूर्वी सत्ताही भोगलेली आहे. त्यामुळे भाजपशी आघाडी त्यांना नवी नाही. एनडीए सरकारच्या काळात गुजरात दंगलींनंतर पासवान यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होतील.
मोदींची केली होती स्तुती : काही दिवसांपूर्वी पासवान यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट असल्याचे वक्तव्य केल्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेषत: लालुप्रसाद यादव यांना चांगलाच धक्का बसला होता. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या विरोधात पासवान यांना आपला भरवशाचा सहकारी मानणार्‍या लालूंच्या पारड्यात आता पासवान यांची मते पडणार नाहीत.