आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी रणनीती : पंचाहत्तरीपार भाजप नेत्यांना फक्त राज्यसभा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाजपेयी-अडवाणींचा काळ ओलांडून नव्या वळणावर आलेल्या भाजपमध्ये आता वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना लोकसभेऐवजी राज्यसभेसाठीच नशीब आजमावावे लागेल. तशी रणनीती पक्षाने तयार केली असून या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली- मनोहर जोशी यांना थेट राज्यसभेचे तिकीट देण्याचे घाटत आहे. मात्र, या रणनीतीवर स्वत: अडवाणीच पाणी फेरण्याच्या तयारीत आहेत. आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे अडवाणींनी जाहीर करून टाकल्याने ‘नव्या पिढीच्या’ भाजप नेत्यांची चांगलीच अडचण केली.

2004 आणि 2009 मधील पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडणुकीच्या दृष्टीने नवी रणनीती आखणे सुरू केले. यात प्रामुख्याने वयोवृद्ध नेत्यांनी तरुण नेतृत्वांना संधी द्यावी, अशी संघाची सूचना होती. सरसंघचालकांनीही तसे स्पष्ट निर्देश संघटनेला दिले होते. मात्र गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ही रणनीती लागू करण्यात आली नव्हती. यंदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप मात्र वयाची 75 ओलांडलेल्या नेत्यांना लोकसभा जागा दिली जाऊ नये, या निर्णयापर्यंत आले असल्याचे समजते. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्या सर्मथक गटानेही या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. यात प्रामुख्याने अडवाणी (86) आणि मुरलीमनोहर जोशी (80) या नेत्यांची व्यवस्था भाजपला लावावी लागेल.

मला कुणी सांगितलेले नाही : अडवाणी
प्रजासत्ताकदिनी पत्रकारांशी बोलताना अडवाणी म्हणाले, यानंतर राज्यसभेत जायचे आहे, याबद्दल कुणी काही सांगितलेले नाही. याउपर कुणी सल्ला मला दिलाच तर त्यावर विचार करेन. तसे असते तर पूर्वीच मी राज्यसभेत गेलो असतो, असे सांगून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत अडवाणींनी दिले.

जोशींना हवे वाराणसी!
एकीकडे नेत्यांना राज्यसभेची द्वारे खुली करण्याचे भाजपमध्ये ठरत असताना मुरली- मनोहर जोशी यांनी मात्र वाराणसी लोकसभेतून लढवण्याचे ठरवले आहे. पक्षाध्यक्षांकडे त्यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली असल्याचे समजते. केंद्रीय राजकारणाचा र्शीगणेशा याच मतदारसंघातून करण्याची मोदी यांची इच्छा आहे, हे विशेष.