आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Black Money Menace: India Makes Fresh Request To Swiss Govt

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळ्या पैसेवाल्यांच्या खात्यांचीही माहिती भारताने मागितली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये दडवून ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची त्यांच्या बँक खात्यांसह माहिती द्यावी, असे पत्र अर्थ मंत्रालयाने स्वित्झर्लंड सरकारला पाठवले आहे. याशिवाय, काळ्या पैशाचा तपास करण्यासाठी भारताने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) स्विस एजन्सींची माहिती देण्याची विनंती त्या सरकारकडे केली आहे.

यापूर्वी स्वित्झर्लंड सरकारने त्या देशातील बँक खातेदारांची एक यादी भारताला सोपवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, यात सरसकट नावे घेण्यात आली आहेत. यात नेमका काळा पैसा कुणी ठेवला आहे, हे स्पष्ट होणे कठीण आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्विस बँकांतील काळा पैसा शोधून काढण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार अर्थ मंत्रालयाने हे पत्र स्वित्झर्लंड सरकारला पाठवले आहे.

2013 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार स्विस बँकांत जमा होत असलेल्या भारतीयांच्या संपत्तीत 43 टक्के वाढ झाली आहे. ही संपत्ती आता 14 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

घोटाळ्यांचीही माहिती द्या : एसआयटी
सर्वोच्च् न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहा यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेली एसआयटी या प्रकरणी तपास करत आहे. विविध एजन्सींनी केलेली करचोरी व आर्थिक घोटाळ्याशी संबंधित माहिती स्विस सरकारकडे मागवण्यात आली आहे. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात पुण्यातील हसन अली व काशिनाथ टपारिया यांच्याशी संबधित प्रकरणाचीही एसआयटी चौकशी करत आहे.

पत्रात आहे काय?
अर्थ मंत्रालयाने स्विस सरकारला पाठवलेल्या पत्रात दोन्ही देशांदरम्यान असलेले द्विपक्षीय करार व शिष्टाचाराचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील काही तरतुदींचा स्पष्ट उल्लेख पत्रात असून करचोरी करून काळा पैसा जमा करणार्‍या भारतीयांची नावे स्विस सरकार भारताला देऊ शकते, असे कळवण्यात आले आहे.

मूळ अडचण काय?
एचएसबीसी बँकेतील खातेदारांची नावे भारताला कळवण्यात स्विस सरकारने स्वारस्य दाखवलेले नाही. ही यादी एका बँक कर्मचार्‍यानेच चोरली होती. यात भारतासह इतर देशांतून आलेला काळा पैसा ठेवणार्‍यांची थेट नावे होती. ही नावे कळवावीत म्हणून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही स्विस सरकारशी पत्रव्यवहार केला होता.
(डेमो पिक)